Sangli News : सांगली जिल्ह्यात पुन्हा 'लम्पी'चे सावट, अवघ्या 11 दिवसात हजारांवर जनावरे बाधित; जनावरांचा आठवडी बाजार, बैलगाडा शर्यतीला बंदी
गेल्या केवळ 11 दिवसांतच एक हजार 92 जनावरे बाधित झाली आहेत. लम्पीची लाट असल्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यात होणारे जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्यात येणार आहेत. बैलगाडा शर्यतींवरही बंदी असेल.
सांगली : सांगली जिल्ह्यात (Sangli News) पुन्हा लम्पी आजाराचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जनावरांचे आठवडी बाजार, बैलगाडा शर्यतीला बंदी घालण्यात आली आहे. जनावरांना लम्पीची बाधा पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
केवळ 11 दिवसांतच एक हजार 92 जनावरे बाधित
वर्षभरानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या केवळ 11 दिवसांतच एक हजार 92 जनावरे बाधित झाली आहेत. लम्पीची लाट असल्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यात होणारे जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय होत असलेल्या बैलगाडा शर्यतींवरही बंदी असेल. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिलेत.
अकरा दिवसांत 27 जनावरांचा मृत्यू
वर्षभर लम्पीबाधित जनावरे आढळत असली तरी प्रमाण कमी होते. गेल्या पंधरवड्यापासून मात्र मोठ्या संख्येने बाधित जनावरे आढळत आहेत. यात अकरा दिवसांत 1016 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे, तर यातील 134 जनावरे बरी झाली आहेत. केवळ अकरा दिवसांत 27 जनावरांचा मृत्यू झाला असून, सध्या 855 लम्पीबाधित जनावरे जिल्ह्यात आहेत. यात वाळवी तालुक्यात सर्वाधिक 488, शिराळा 283, पलूस 256, मिरज 23, तासगाव 13, कवठेमहांकाळ 18, तर कडेगाव तालुक्यात 11 जनावरे बाधित आहेत.
बैलगाडा शर्यतीला बंदी
दरम्यान, यापूर्वी शर्यतीला परवानगी दिली असली, तरी परवानग्या रद्द होणार आहे. गोजातीय प्रजातीची गुरे व म्हशीचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यत लावणे, बैल गाडी शर्यत आयोजित करणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास सांगली जिल्ह्यात मनाई करण्यात येत आहे.
नियंत्रित क्षेत्रामधील बाजार पेठेत, जत्रेत, प्रदर्शन किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यालाही मनाई करण्यात येत आहे. बाधित गांवामध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्याची पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आली आहे. लम्पीचा विषाणू वीर्यामधूनही बाहेर पडत असल्यामुळे वीर्य मात्रा बनवणाऱ्या संस्थांमार्फत होणारे वीर्य संकलन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वळूंची चाचणी करुन रोगासाठी निगेटिव्ह असलेल्या वळूंचे वीर्य संकलन करणे किंवा नैसर्गिक संयोगासाठी वापर करावा, असेही निर्देश आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या