Pune News : भारताचे नवीन 'रेसलिंग सेंसेशन'! ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी झाले विश्वविजेता; वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स मिळवले सुवर्णपदक
अप्पर पोलिस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी 29 जुलै 2023 रोजी कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळामध्ये भारताचे नाव उंचावले आहे.

Pune News : कुस्ती खेळातील महाराष्ट्राचा (Pune News) स्टार कुस्तीपटू तीन वेळा 'महाराष्ट्र केसरी' विजेते आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी (Vijay Chaudhari) यांनी 29 जुलै 2023 रोजी कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती (Wrestling) या खेळामध्ये भारताचे नाव उंचावले आहे.
जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे असलेले चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, इतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे.
वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चौधरी यांनी उपांत्य फेरीत त्यांच्या सर्वात कठीण प्रतिस्पर्ध्याचा सामना केला. त्यांचा सामना गतविजेत्या जेसी साहोटाशी झाला. अटीतटीच्या सामन्यात चौधरी यांनी साहोताचा 11-08 अशा फरकाने पराभव केला.अंतिम सामन्यात, विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर 10 गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना 11-01 ने जिंकत भारताला 125 kg मध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले.
बायो बबलमध्ये राहिले, कॅनडाच्या वेळेनुसार केला सराव...
चौधरी यांना काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते आणि पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाइम झोननुसार प्रशिक्षण घेत होते. महाराष्ट्र राज्यातील एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित कुस्तीपटू विजय चौधरी आता जागतिक चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून भारताचे नवीन 'रेसलिंग सेंसेशन' बनले आहेत.
आपल्या विजयाबद्दल बोलताना चौधरी म्हणाले की, "काही महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच मी ठरवले होते की मला जागतिक पोलीस खेळांमध्ये माझ्या देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे. आज माझ्या मेहनतीचे चीज झाले असून मी जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा मला आनंद आहे."
महाराष्ट्र राज्य पोलीस विभागातील माझ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी , परिवार, गुरु, गाव, मित्रमंडळींच्या सततच्या पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाला, असे चौधरी यांनी सांगितलं. चौधरी पुढे म्हणाले की, "मी हा विजय भारतातील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला व अंमलदारांना समर्पित करतो जो देशाला प्रथम स्थान देऊन समाजाची 24 तास सेवा करत असतो. हे सुवर्णपदक मी संपूर्ण भारतीय पोलीस दलाला समर्पित करतो."
हेही वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
