(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News: 'या' कारणामुळे 1000 हून अधिक फ्लेक्स हटवले; पुणे पोलीस, महानगरपालिकेची मोठी कारवाई
राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाने शहरातून 1000 पेक्षा जास्त फ्लेक्स आणि बॅनर हटवले.
Pune News: राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातून 1000 पेक्षा जास्त फ्लेक्स आणि बॅनर हटवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काही ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. एकनाथ शिंदेयांच्या पक्षासोबत गेलेल्या आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड केली जात आहे. अशा स्थितीत सर्वत्र तणावाचे वातावरण आहे.
पुण्यात शिवसैनिकांनी बालाजीनगर येथील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. एकमेकांविरोधातील फ्लेक्स आणि बॅनर्सवरून होणारे राजकीय वाद टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरातील अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कारणांसाठी संभाव्य उमेदवारांकडून शहरातील चौका-चौकांत बॅनर, फ्लेक्स लावले जात आहेत किंवा आहे.मोठ्या संख्येने उमेदवारांनी स्वागताचे बॅनर, फ्लेक्स लावले होते. त्यांना राजकीय प्रचाराचे स्वरूप देण्यात आले आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एका पक्षाचे कार्यकर्ते फ्लेक्स आणि बॅनरच्या माध्यमातून दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांवर टीका करू शकतात. त्यामुळे आंदोलने होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पालिकेच्या सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने संपूर्ण शहरात होर्डिंग हटविण्याची मोहीम राबवली.
शिवसैनिक आक्रमक
शिवेसेनेचे भूम-परांडा तालुक्याचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्या हल्ल्यात सहभागी असलेले शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. नशीब पुण्यात आमदार नाही, अन्यथा सोलून काढला असता, असं विधान पुण्याचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केलं होतं.