Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची चीनसह भारतावर परस्पर कराची तलवार, अंमलबजावणीची तारीख सांगितली
Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. याची अंमलबजावणी लवकरच सुरु होणार आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली. भारत आणि चीनवर परस्पर शुल्क 2 एप्रिलपासून आकारणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी यापूर्वीच मेक्सिको, कॅनडावर 25 टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. तर, चीनवरील आयात शुल्क 10 टक्क्यांवरुन 20 टक्के केलं आहे.
भारतावर परस्पर शुल्क लागू
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीन यांच्या विरुद्ध परस्पर शुल्क 2 एप्रिलपासून लागू करणार असल्याचं म्हटलं. यापूर्वीच कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर टॅरिफ लादलं आहे. भारत आपल्यावर 100 टक्के कर लावतो. आपण देखील त्यांच्यावर कर लावायचा असं ट्रम्प म्हणाले. जो देश जितका कर आपल्यावर लावेल तितका कर त्या देशावर लावायचा, अशी भूमिका ट्रम्प यांनी मांडली.
डोनाल्ड ट्रम्प हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्सच्या कक्षात काँग्रेसच्या संयुक्त सत्राला संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी त्यांचं प्रशासन 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं गोल्ड कार्ड सुरु करणार असल्याचं म्हटलं. यामुळं जगभरातील प्रतिभावान आणि मेहनती लोकांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग मिळेल. हे ग्रीन कार्ड सारखंच पण त्यापेक्षा चांगलं असेल, असं ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व प्रकराच्या विदेशी मदतीवर रोख लावला आहे. हा अमेरिकेच्या धोरणातील मोठा बदल असेल. याशिवाय अमेरिकेत आता केवळ दोन लिंग असतील. पुरुष आणि महिला ही केवळ लिंग असतील हे अमेरिकेचं अधिकृत धोरण आहे, असं ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्लाचे प्रमुख एलन मस्कचं कौतुक केलं आहे. त्यावेळी मस्क चेंबरमध्ये बसले होते, खासदारांनी टाळ्या वाजवून एलन मस्कचं अभिनंदन केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्रजी ही अमेरिकेची अधिकृत भाषा असेल असं देखील जाहीर केलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचं समर्थन करताना अमेरिकेला पुन्हा समृद्ध आणि सामर्थ्यवान करण्यासाठी ते आवश्यक असल्याचं म्हटलं. अमेरिकेला पुन्हा सरकार महान बनवायचं असल्यास टॅरिफ गरजेचे असल्याचं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेला कॅनडा आणि चीनचं उत्तर
अमेरिकेनं चीन, मेक्सिको, कॅनडावर आयात शुल्क लादल्यानंतर टॅरिफ वॉर सुरु होण्याची शक्यता आहे. अमेरिकेला चीन आणि कॅनडानं देखील उत्तर दिलं आहे. कॅनडा आणि मेक्सिको देखील अमेरिकेवर आयात शुल्क लादणार आहे. चीननं अमेरिकेवर 15 टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली. अमेरिकेनं कॅनडा आणि मेक्सिकोवर 25 टक्के आयात शुल्क लादलं आहे.
इतर बातम्या :























