Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
Hasan Mushrif : मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्याने 800 किमीचा प्रवास करण शक्य नसल्यामुळे पालकमंत्री पद सोडल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे

Hasan Mushrif : पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरुच असतानाच कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी संधी न मिळाल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नाराजी लपून राहिलेली नाही. 26 जानेवारीला ध्वजारोहण करून आल्यानंतर वाशिमकडे फिरकून परत न गेलेल्या हसन मुश्रीफ यांनी आता जबाबदारी सोडली आहे.
प्रवास करणं शक्य नसल्यामुळे पालकमंत्री पद सोडल्याची चर्चा
मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्याने 800 किमीचा प्रवास करण शक्य नसल्यामुळे पालकमंत्री पद सोडल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता वाशिम जिल्ह्याला लवकरच नवीन पालकमंत्री मिळणार आहे. क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे लवकरच पालकमंत्री पदाची जबाबदारी घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुश्रीफ 26 जानेवारीच्या कार्यक्रमानंतर वाशिम जिल्ह्यात गेलेच नाहीत.
कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरून धुसफूस
दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री शिवसेनेकडे गेलं असून सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आहे. त्यामुळे आबिटकरांच्या निवडीवर मुश्रीफांची नव्हे, तर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचीही नाराजी लपून राहिली नाही. हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरपासून थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. 26 जानेवारीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुश्रीफ वाशिमला पोहोचले. मात्र, शासकीय ध्वजरोहणाचा कार्यक्रम पार पडताच कोणतीही बैठक न घेता त्यांनी थेट पुन्हा कोल्हापूर गाठलं होतं. वाशिम जिल्हाला लागलेला झेंडा टू झेंडा पालकमंत्री हा डाग पुसू आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा दिली जाईल, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले होते. मात्र, त्यांची घोषणा फक्त घोषणाच राहिली आहे.
नाशिकचा तिढा सूटला, रायगडचा कायम
दरम्यान, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुद्धा वाद सुरु आहे. हा वाद अमित शाहांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे आता रायगडचा वाद अजूनही कायम आहे. याठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद सुरु आहे. शिवसेनेकडून कोणत्याही परिस्थितीत पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या

























