Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील प्रकरणात महिला पोलीस अधिकारी निलंबित; बेजबाबदारपणामुळे ललित पाटीलला पळून जाण्यास संधी मिळाल्याचा आरोप
ललित पाटील प्रकरणात रोज नवनवे कनेक्शन्स समोर येत आहे. त्यातच ललित पाटील हा ससूनमधून पळून गेल्याप्रकरणी आणखी एका महिला सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

पुणे : ललित पाटील प्रकरणात रोज नवनवे कनेक्शन्स समोर येत आहे. (Sasoon Hospital Drug Racket) त्यातच ललित पाटील (Lalit Patil) हा ससूनमधून पळून गेल्याप्रकरणी आणखी एका महिला सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. सविता हनुमंत भागवत असे या महिला सहायक पोलीस निरीक्षक नाव आहे. ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये लक्ष ठेवण्याची जबाबदारी असताना देखील त्यामध्ये कसूर केल्याचा ठपका पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनी ठेवला आहे. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हे आदेश काढले आहेत.
सविता यांची 30 सप्टेंबर रोजी दिवसपाळी होती. मात्र, कर्तव्यावर हजर न राहता केवळ अर्धा तास उपस्थित होत्या. त्याच्या अनुपस्थितीमुळे ललितला एक अज्ञात व्यक्ती भेटली आणि त्यानंतर तो पसार झाला. त्यामुळे कामातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणामुळे आरोपी ललित पाटील याला पळून जाण्यास संधी मिळाली, असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. सविता भागवत यांची नेमणूक मुख्यालयाच्या कोर्ट कंपनी युनिटमध्ये होती. त्यांची 9 ते 9 शिफ्ट होती. यात त्यांनी या सगळ्यावर देखरेख ठेवणं अपेक्षित होतं मात्र त्या पूर्ण वेळ कामावर हजर नसल्याचं समोर आलं आहे. त्यात त्यांनी फक्त अर्धा तास कैद्यांच्या वॉर्डमध्ये गेल्याचं दिसून आलं. हे सगळं पाहता त्यांनी कामात निष्काळजीपणा केल्याचं स्पष्ट झालं आणि त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
संजीव ठाकूर देत होते आश्रय...
ड्रग माफिया ललित पाटील नेमक्या कोणत्या डॉक्टरच्या शिफारशीवरुन ससून रुग्णालयात पाहूणचार घेत होता आणि त्याच्यावर नेमके कोणते डॉक्टर उपचार करत होते, याची माहिती 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. ससून रुग्णालयातील डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी या संदर्भात माहिती देताना उडवाउडवीचे उत्तरं दिले होते. मात्र स्वत: डीन ठाकूर हेच ललित पाटीलवर उपचार करत असल्याचे आरोपींच्या रजिस्टरवर नोंद आहे. त्यामुळे मागील काही महिने ललित पाटीलचा पाहूणचार थेट डॉ. संजीव ठाकूर करत असल्याचं सिद्ध झालं आहे.
ससूनमधून पळालेल्या ललित पाटीलने छत्रपती संभाजीनगरमध्येही ठोकला मुक्काम
पुण्यातील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर ललित पाटीलने छत्रपती संभाजीनगरमध्येही मुक्काम केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच गुजरात पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरात छापेमारी करत तब्बल 500 कोटींचे ड्रग्ज ड्रग्ज पकडले होते. त्यामुळे आता ललित पाटीलचे छत्रपती संभाजीनगर कनेक्शन नेमकं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर ललित पाटील अधिक चर्चेत आला. त्यानंतर नाशिकमध्ये त्याचे ड्रग्जचा कारखाना सुरु असल्याचे समोर आले. तर, नाशिक शहरात त्याचे स्वतंत्र नेटवर्क असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर तो पहिले गुजरातमधील मित्रांकडे गेला होता. तेथून बंगळुरूला पळून जाण्याआधी त्याने छत्रपती संभाजीनगर शहरात मुक्काम ठोकला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
