Mohan Bhagwat : ....मात्र थोडश्या ज्ञानाने फुगलेल्याला ब्रह्मदेव पण समजावू शकत नाही; मोहन भागवत यांचे वक्तव्य
Mohan Bhagwat : धर्माचे आचरणकर्तेच त्याचे रक्षणकर्ते आहे, असं वक्तव्य केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी.
Amravati News अमरावती: सृष्टीच्या प्रारंभापासून धर्म आहे, म्हणूनच त्याला सनातन म्हणतात. जो धर्माला मानतो त्याचे कल्याण होते, जो मानत नाही त्याला ठोकर बसते. धर्म हा सत्याचा आकार असल्याने त्याचे रक्षण झाले पाहिजे. धर्माचे आचरणकर्तेच त्याचे रक्षणकर्ते आहे, असं वक्तव्य केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी. अमरावती येथील महानुभाव आश्रमाचा शतकपूर्ती महोत्सवच्या समारोप कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते.
मोहन भागवत म्हणाले की, धर्माचे आचरण समजले पाहिजे आणि समजल्यावर मनात ठेऊन चालणार नाही, तर ते बुद्धीत आणून धर्माला अपेक्षित कृती झाली पाहिजे. धर्म समजावा लागतो तो समजवणे कठीण असले तरी अडाण्याला तो लगेच समजवता येतो. पण, थोडश्या ज्ञानाने फुगलेल्याला ब्रह्मदेव पण समजावू शकत नाही. धर्माच्या नावाखाली जे अत्याचार पूर्वी झाले ते चुकीच्या समजुतीने झाले. प्रबोधन करणारे पंथ आणि संप्रदाय हे आपल्या देशाचे वैभव आहे. विपरीत परिस्थितीतही महानुभाव पंथाचे कार्य अविरत सुरू असून ते आदरणीय आहे. संप्रदाय कोणताही असो तो एकमेकांना जोडायला शिकवतो. एकता ही शाश्वत असते. सगळे विश्व एक आहे. अहिंसेने वागणे हेच धर्माचे रक्षण आहे. संघ धर्म रक्षणाचेच कार्य करतो आहे. सत्य संकल्पाने कार्य केले की ते पूर्ण होतात, असेही मोहन भागवत यांनी आवर्जून सांगितले.
'मानवतेची सेवा करणे हाच धर्माचा उद्देश'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पुढे म्हणाले की, 'धर्माला नीट समजून घेतल्यास समाजात शांतता, सौहार्द आणि समृद्धी येऊ शकते. धर्माचा खरा उद्देश मानवतेची सेवा करणे आणि मार्गदर्शन करणे हा आहे आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला किंवा अत्याचारांना प्रोत्साहन देणे नाही. धर्माच्या मूलभूत तत्त्वांवर भर देताना ते म्हणाले की, धर्माचे अचूक ज्ञान आणि पालन केल्याने समाजाची उन्नती होते आणि सर्वांचे कल्याण होते. असेही मोहन भागवत म्हणाले.
'अपूर्ण ज्ञानामुळे अधर्म होतो- मोहन भागवत
पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, धर्माचे अपूर्ण ज्ञान अधर्माकडे घेऊन जाते. धर्माच्या नावाखाली जगभर जे काही अत्याचार आणि अत्याचार झाले, ते खरे तर धर्माबद्दलच्या गैरसमजामुळे आणि अज्ञानामुळे झाले. धर्म सदैव अस्तित्वात आहे आणि जगात सर्व काही त्याच्यानुसार चालते असेही ते म्हणाले. म्हणून त्याला सनातन म्हणतात. ते पुढे म्हणाले, धर्माचे पालन करणे हेच धर्माचे रक्षण आहे.
हे ही वाचा