Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीत संघाचा कर्णधार बदलणार? खराब फॉर्म नाही तर... समोर आले मोठे कारण, कोण होणार कॅप्टन?
बऱ्याच वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर आयसीसी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
ICC Champions Trophy 2025 Australia : बऱ्याच वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर आयसीसी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. ही स्पर्धा आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर खेळली जात आहे. गेल्या वेळी पाकिस्तानने 2017 मध्ये भारताला हरवून विजेतेपद जिंकले होते. दरम्यान, भारतीय संघाने आणि पाकिस्तान अजून तरी संघाची घोषणा केली नाही. त्याआधी ऑस्ट्रेलियाने 13 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्यांचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला. पॅट कमिन्सला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले.
2009 मध्ये शेवटचे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस आणि आरोन हार्डी सारख्या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश केला आहे. त्याच वेळी, नॅथन एलिसला वेगवान गोलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. संघाची तुलना 2023च्या वर्ल्ड कपशी केली तर फक्त 3 बदल करण्यात आले आहेत. डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून ग्रीन आणि शॉन अॅबॉट हे या संघात नाहीत. त्यांच्या जागी मॅथ्यू शॉर्ट, आरोन हार्डी आणि नॅथन एलिस यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होतील. ऑस्ट्रेलियाला इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानसह गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केला असेल, परंतु कर्णधाराबद्दलची अनिश्चितता अजूनही कायम आहे.
खरंतर, पॅट कमिन्स सध्या ब्रेकवर आहे आणि श्रीलंका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो खेळणार नाही. त्याच्या तंदुरुस्तीबद्दलही शंका आहेत. अशा परिस्थितीत, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचे खेळणे अद्याप निश्चित झालेले नाही. यामुळे ऑस्ट्रेलियन संघ प्रचंड टेन्शनमध्ये आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत संघाचा कर्णधार बदलणार?
ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी संघाची घोषणा करताना सांगितले की, हा एक संतुलित आणि अनुभवी संघ आहे ज्यांचे बहुतेक खेळाडू गेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये खेळले आहेत. दरम्यान, बेली म्हणाले की, पॅट कमिन्स आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध असेल की नाही हे आता सांगु शकत नाही. अलिकडेच कमिन्सने त्याच्या घोट्याची टेस्ट केली, पण त्याच्या दुखापत अजून स्पष्ट झाली नाही. जर कमिन्स खेळला नाही, तर टी-20 कर्णधार आणि डॅशिंग अष्टपैलू मिचेल मार्श चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्व करू शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स केरी, नॅथन एलिस, अॅरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, मार्कस स्टोइनिस, अॅडम झाम्पा.