Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
बीड हत्याप्रकरणात सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालत आहेत, अगदी सुरुवातीपासून मुख्यमंत्री म्हणत आहेत की कोणीही दोषी असला तरी कारवाई होईल.
मुंबई : बीड सरपंच हत्याकांड प्रकरणात आज खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडवर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आज केज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, सीआयडीने मकोको अंतर्गत वाल्मिक कराडला ताब्यात घेतलं असून उद्या न्यायालयात हजर केले जाऊ शकते. तत्पूर्वी प्रकृती बिघडल्याने वाल्मिक कराडला (Walmik karad) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करताना धनंजय मुंडे, वाल्मिक कराड तसेच तपासाबाबत भूमिका स्पष्ट केली. जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा, असे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आल्याचं अजित पवारांनी म्हटले. यावेळी, हॉरवेस्ट मशिनसाठी अनुदान मिळवून देतो म्हणत वाल्मिक कराडने शेतकऱ्यांकडून पैसे उकळल्यासंदर्भातही अजित पवारांना प्रश्न विचारला होता. त्यावरही अजित पवारांनी (Ajit Pawar) भूमिका स्पष्ट मांडली. तर, तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, असा प्रतिसवालही विचारला.
बीड हत्याप्रकरणात सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालत आहेत, अगदी सुरुवातीपासून मुख्यमंत्री म्हणत आहेत की कोणीही दोषी असला तरी कारवाई होईल. या घटनेला महिना होऊन गेला म्हणून त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. या घटनेची न्यायाधीशां मार्फत चौकशी होणार आहे, ही निर्घृण हत्या आहे. त्यामुळे, आरोपी कोणीही असो, कारवाई होणार. हे शाहू-फुले-आंबेडकरांचे राज्य आहे. माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य झालंय, आरोपी कोणीही असो, थारा देणार नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था टिकली पाहिजे, असा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर आज मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून एसआयटी पथकाने त्यास ताब्यात घेतलं आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आले होते.
पालकमंत्री कोण हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर मंत्रिमंडळ स्थापन व्हायला वेळ लागला, हे खरं आहे. उद्या मोदीजी महाराष्ट्रात येत आहेत, आज मुख्यमंत्री पानिपतमध्ये आहेत. 19 तारखेला दावोसला जाणार आहेत. त्याआधी पालकमंत्री निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे, पुढील 3 ते 4 दिवसांत पालकमंत्र्यांच्या निवडी जाहीर होतील, असेच त्यांनी सूचवले आहे.
शेतकरी फसवणूक व धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवारांना आज पुन्हा एकदा पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर, याची चौकशी होऊ द्या, चौकशीत जो कोणी असेल त्याला सोडणार नाही, असे उत्तर अजित पवारांनी दिले. तसेच, वाल्मिक कराडने काही शेतकऱ्यांनी फसवणूक केली असून त्यांच्याकडू पैसे हडपल्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, याची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल. मी आत्ता म्हटलं तू माझ्याकडू 1 लाख रुपये घेतले, घेतले का? असा सवालच अजित पवारांनी पत्रकारांना विचारल्याचं पाहायला मिळालं. तसेच, मी पण शेतकरी आहे, शेतकरी म्हणूनच बोलतोय तू माझ्याकडून लाख रुपये घेतले. चुकीची माणसं असतील तर बाजूला करावे लागते, पुरावे असतील तर द्या, आम्ही चौकशी करू, कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे अजित पवारांनी म्हटले.