Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
शिवसेना युबीटी पक्षात जे पदाधिकारी काम करत नाहीत, त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं.
मुंबई : शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव हे शिवसेना (Shivsena) शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा विधानसभा निवडणुकांपूर्वी रंगल्या होत्या. मात्र, आपण कुठेही जाणार नसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असल्याचे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले होते. आता, विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना पक्षाकडून पराभवाचं आत्मचिंतन केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर बैठका घेऊन पदाधिकारी व आमदारांसोबत चर्चा केली जात आहे. तर, आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णयही खासदार संजय राऊत यांनी जाहीर केला. दरम्यान, भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर, आता शिवसेना शिंदे गटाकडून थेट भास्कर जाधवांना (Bhaskar Jadhav) ऑफर देण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.
शिवसेना युबीटी पक्षात जे पदाधिकारी काम करत नाहीत, त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं. शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली असल्याचे वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी केले होते. कोकणातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांयचा कार्यकाळ निश्चित करा असा सल्ला भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांना दिला. भास्कर जाधव यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर, आज शिवेसना शिंदे गटाकडून भास्कर जाधव यांना खुली ऑफर देण्यात आलीय.
भास्कर जाधव सिनियर नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाची, अनुभवाची आम्हाला गरज आहे. भास्कर जाधवांना शिवसेना पक्षात घ्यायचं की नाही हा निर्णय शिंदे साहेब घेतील. पण, मी सांगतो ते खूप मोठे नेते आहेत, आम्हाला ते आमच्या पक्षात आले तर आवडेल, अशा शब्दात उदय सामंत यांनी भास्कर जाधवांचे पक्षात स्वागतच केले आहे. त्यामुळे, आता भास्कर जाधव उदय सामंतांची ऑफर स्वीकारतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, भास्कर जाधव जे आता बोलत आहेत, ते आम्ही अडीच वर्षांपूर्वी केलं. आता त्यांची घुसमट का होतेय हे त्यांना विचारा, असेही सामंत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले संजय राऊत
भास्कर जाधव काय बोलले हे मला मीडियाकडून समजतंय, मी त्यांच्याशी चर्चा करेन. जाधव यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे, पण पक्ष संघर्ष आणि संकटातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे, असा सल्लाच संजय राऊत यांनी भास्कर जाधवांना दिला आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा