सांगोल्यात शहाजीबापू निवडणूक लढणार नाहीत, दीपक साळुंखे वि. बाबासाहेब देशमुख अशी लढत होईल : उत्तम जानकर
आमदार शहाजी बापू पाटील निवडणूक लढवणार नाहीत. सांगोल्यात दीपक आबा साळुंखे विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब देशमुख अशी निवडणूक होईल,असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी केला आहे.
सांगोला : सांगोल्यातून विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील निवडणूक लढवणार नाहीत. सांगोल्यात दीपक आबा साळुंखे विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब देशमुख अशी निवडणूक होईल,असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी केला आहे. ते कोळा येथील सभेत बोलत होते. सांगोला तालुक्यातील कोळा येथे आज आयोजित सत्कार समारंभात उत्तम जानकर बोलत होते. यावेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, काँग्रेसचे माजी आमदार रामहरी रुपनवर , सांगोल्याचे इच्छुक उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि मोठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्यावेळी मी तिथे गेल्यावर मला जेवण घालायलाही त्यांच्याकडे खिशात पैसे नव्हते
शहाजीबापूंनी आजवर जेवढ्या निवडणुका लढवल्या त्या प्रत्येक वेळी त्यांच्या खिशात एकही रुपया नसायचा. अगदी गेल्यावेळी मी तिथे गेल्यावर मला जेवण घालायलाही त्यांच्याकडे खिशात पैसे नव्हते. बापू नेहमी दुसऱ्याच्या पैशावर रिस्क घेतात. आता मात्र बापू शिलकीमध्ये आहेत , असा टोलाही जानकर यांनी लगावला.
यंदाची निवडणूक ही दीपक आबा विरुद्ध बाबासाहेब देशमुख अशीच होणार
पुढे बोलताना जानकर म्हणाले, बापूला हे नक्की माहिती आहे की यंदा निवडणूक दुरंगी झाली तर काय होणार? आता तर दीपक साळुंखे यांच्या रूपाने तिसरा उमेदवार आलाय. त्यांना सांगोला आणि मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही दीपक आबा विरुद्ध बाबासाहेब देशमुख अशीच होणार याची मला खात्री आहे. शहाजी बापू रिंगणातून माघार घेतील असा दावा उत्तम जानकर यांनी केला आहे.
सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या मागे जनतेची जोरदार उसळी आहे. महाराष्ट्राचे चित्र काय असणार हे सगळ्यांना समजत आहे. त्यामुळे यावेळी सांगोल्यात आबा विरुद्ध बापू अशीच लढत पाहायला मिळेल, असंही जानकर म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या