NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
Ajit Pawar & Sharad Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. यात दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. जर शरद पवारांसोबत (Sharad Pawar) असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर आधी जे अजित पवारांसोबत (Ajit Pawar) निष्ठावान राहिले त्यांचा विचार करावा, त्यांना विविध संधी द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवारांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचे दिसून आले. यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील दुरावा वाढत गेल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून सुप्रिया सुळे निवडून आल्या. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे युगेंद्र पवारांच्या विरोधात निवडून आले. या दोन्ही निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळाला. यानंतर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत सहकुटुंब भेट घेतली होती. त्यातच अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी सर्व पवार कुटुंब एकत्र येऊ देत आणि वाद संपू देत, असे साकडे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात घातले. यानंतर काका-पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. यात बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जर शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर आधी जे अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले, त्यांचा विचार करावा, त्यांना विविध संधी द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर 2 जुलैला पक्षात फूट पडली. त्यावेळी अजित पवारांवर विश्वास ठेऊन जे आले होते त्यांना टिकेचा सामना करावा लागला. त्यामुळे ज्यांनी टीकेची झळ सोसली, त्यांच्यावर अनन्या नको, अशा भावना कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसमोर व्यक्त केल्या आहेत. तर दुसरीकडे मागील काही दिवसांत पक्षातील पदाधिकारी एकमेकांवर ज्या प्रकारे टीका करतात, त्यावरून पक्षाची नाहक बदनामी होतेय. ती थांबायला हवी, अशी वरिष्ठ भावना का वरिष्ठ पदाधिकाऱ्याने बैठकीत बोलताना व्यक्त केली आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चांचे पडसाद राष्ट्रवादी अजित पवार गटात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा