भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप दोन महिन्यात भाकरी फिरवणार असून विधानसभा निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवा चेहरा मैदानात असणार आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांत भाजपला घवघवतीस यश मिळालं असून महायुतीमध्ये सर्वाधिक 132 जागा जिंकत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे, भाजपच्या या यशाचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांना दिलं जातं. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजागी आता नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे. आगामी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून (BJP) भाकरी फिरवली जाणार असून प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा व पदभार देण्यासाठी मार्च महिन्याचा मुहूर्त ठरला आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप दोन महिन्यात भाकरी फिरवणार असून विधानसभा निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवा चेहरा मैदानात असणार आहे. भाजपकडून प्रदेशाध्यपदाची जबाबदारी नव्या चेहऱ्याकडे देण्यात येत असून भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार असल्याचे समजते.
बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख निवडीनंतर राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड करण्यात येईल. नुकतेच भाजपने संघटन पर्व अभियान सुरू केले असून या संघटन पर्व अभियानाची जबाबदारी व राज्याचे प्रभारी म्हणून माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. आमदार चव्हाण यांनीही पदभार स्वीकारताच अभियानाच्या कामाला सुरुवात केली असून जानेवारीत सदस्य नोंदणी, तर फेब्रुवारी महिन्यात बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त असणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी विशेष निवडप्रक्रिया राबवली जाणार आहे.
काय आहे संघटनपर्व
भाजपचा विस्तार आणि 2029 मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपकडून नव्या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाची मूळ संघटना आणि इतर मोर्चा आणि पक्षातील सेलला पक्षाच्या वाढीसाठी सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले असून महिला मोर्चा युवा मोर्चा ओबीसी मोर्चा या मुख्य मोर्चांसह इतर सेल व आघाड्यांना सदस्य नोंदणीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना भाजपशी जोडण्याचं लक्ष देण्यात आले. 1 जानेवारी ते 15 जानेवारी यादरम्यान होणाऱ्या संघटन पर्व या अभियानाच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना भाजपसोबत जोडण्याचं टार्गेट ठेवण्यात आले आहे
कशी असेल भाजपची निवड प्रक्रिया?
1 ते 20 जानेवारीपर्यंत भाजप सदस्य नोंदणी अभियान राबवणार
20 ते 28 जानेवारी दरम्यान तब्बल 5 लाख अॅक्टीव्ह सदस्य तयार करण्यात येतील.
1 ते 10 फेब्रुवारी दरम्यान 1 लाख बुथ प्रमुखांची निवड केली जाणार आहे.
भाजपकडून 10 ते 20 फेब्रुवारी दरम्यान राज्यात 708 तालुका प्रमुखांची निवड केली जाणार आहे.
भाजपच्यावतीने 20 ते 28 फेब्रुवारी दरम्यान 78 जिल्हा प्रमुखही निवडले जाणार आहेत.
अखेर 15 मार्चपर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असून भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे.