बारामती, माढा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, राज्यातील हायव्होल्टेज 11 लढतीमध्ये कुणाची सरशी? आज मतदान
Lok Sabha Election : राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रासह इतर ठिकाणच्या 11 लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे.
मुंबई: लोकसभा निवडणुकीचा (Third phase voting Lok Sabha) राज्यातील तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत असून त्यामध्ये बारामती, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह एकूण 11 हायव्होल्टेज लढतींचा समावेश आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यातील दोन्ही गटांची अग्निपरीक्षा या निमित्ताने होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार की सहानुभूतीची लाट चालणार याचं उत्तर मिळणार आहे.
महाराष्ट्रातल्या निवडणुकीतला हा सर्वात हायव्होल्टेज लढती असणारा टप्पा आहे. बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, रायगड, सोलापूर, लातूर या 11 लक्षवेधी लढती असल्यानं आजच्या मतदानाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
यातील सर्वाधिक मोठी लढत होत आहे ती म्हणजे बारामतीची. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नणंद-भावजया एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत. त्यासाठी शरद पवारांची आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र आहे.
या 11 मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत होणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत नव्या पक्षांची अग्निपरीक्षा या टप्प्यात होत आहे.यातले सर्वाधिक चुरशीच्या असलेल्या 7 महत्त्वाच्या लढत्या कोणत्या आहे ते पाहुयात,
रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत आहे.
धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील अशी लढत होत आहे.
साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत आहे.
कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज अशी लढत आहे.
सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत आहे.
माढ्यात भाजपचे रणजित नाईक-निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील अशी लढत आहे.
बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार असा नणंद-भावजय सामना आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने भाजप विरूद्ध काँग्रेस असं लढतीचं स्वरूप होतं. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर सहानुभूतीची लाट प्रभावी ठरते का याचा निवाडा या तिसऱ्या टप्प्यात होणार असल्यानं सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ही बातमी वाचा: