(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chitra Wagh: माझ्या मुलींना सासरी त्रास होतो; संजय राठोडांविरोधातील चित्रा वाघ यांच्या याचिकेवर वडिलांचा मध्यस्थी अर्ज
Maharashtra Politics: तरुणीला आत्महत्या करण्यास संजय राठोड यांनी प्रवृत्त केल्याचा संशय वाढल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी वाढत गेली. त्यावेळी चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात अक्षरश: रान उठवले होते.
मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप झाले होते. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी या सगळ्याविरोधात आक्रमक भूमिका घेत संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र, या प्रकरणाशी संबंधित बातम्या आल्यानंतर आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन होते. माझ्या मुलींसंबंधी बातम्या येतात, तेव्हा त्यांना सासरी त्रास होतो, असे म्हणत महिलेच्या वडिलांनी चित्रा वाघ यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत मंगळवारी मध्यस्थी अर्ज दाखल केला.
ही याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित असून कुटुंबीयांची बदनामी होत आहे. त्यामुळे, ही बदनामी थांबवा, अशी विनंती या तरुणीच्या वडिलांतर्फे उच्च न्यायालयात करण्यात आली. जनहित याचिका दाखल केल्याबद्दल कोणत्याही राजकीय व्यक्तीला आपला विरोध नाही. परंतु, कोणतेही आदेश देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्यात यावी, असेही तरुणीच्या वडिलांनी अर्जात म्हटले आहे. आपला कोणाविरोधात राग किंवा तक्रार नाही. मात्र, माझ्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी दाखल जनहित याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे वडिलांनी न्यायालयाला सांगितले.
फेब्रुवारी २०२१मध्ये संबंधित महिलेने राहत्या घराच्या बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्या केली होती. या आत्महत्येशी संजय राठोड यांचे नाव जोडण्यात आले होते. राठोड महाविकास आघाडीत असताना वाघ यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
उच्च न्यायालयाने चित्रा वाघ यांना सुनावले
काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी आपल्या वकिलांमार्फत संजय राठोड यांच्याविरोधातील जनहित याचिका मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या वकिलाला खडे बोल सुनावले होते. राजकारण्यांनी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत न्यायालयांना त्यात विनाकारण ओढू नये. बदललेल्या राजकीय स्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर करून न्यायालयांना त्यात ओढले जात आहे. न्यायालयं हा राजकारण करण्याचा मार्ग नाही, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने म्हटले होते.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सतेत असताना चित्रा वाघ यांनी 2021 मध्ये संजय राठोड यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र, आता तेच संजय राठोड हे शिंदे गटात असून भाजपसोबत सत्तेत येऊन बसले आहेत.
आणखी वाचा