Bharat Gogawale On Sunil Tatkare: मंत्री गोगावले म्हणाले, शिंगावर घेऊ, आमदार दळवींचाही तटकरेंना सज्जड दम; रायगडमध्ये राजकीय वातावरण तापलं!
Bharat Gogawale On Sunil Tatkare: महायुतीतील पालकमंत्रिपदाचा वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.
Bharat Gogawale On Sunil Tatkare रायगड: नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरुन येता काही दिवसांत घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समवेत बैठक करून तोडगा काढण्याच्या हालचाली सुरु होणार आहे. देवेंद्र फडणवीस विद्यमान पालकमंत्री कायम ठेवणार की नवनियुक्त करणार याकडे लक्ष सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यात टोलेबाजी सुरु असल्याचं दिसून येत आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम केले,कोणी अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असा इशारा भरत गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरेंना दिला आहे.
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथे स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर प्रवेशद्वार नामकरण सोहळ्याचे उद्घाटन प्रसंगी आज पुन्हा एकदा शिंदे सेनेच्या आमदारांकडून खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी विरूद्ध शिंदे सेना वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एकमेव रायगडाची लोकसभेची जागा आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. आमची चूक झाली असेल तर आम्ही मंत्रिपद सोडू...आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. कावळे नाही. कोणी आमच्या अंगार आले तर आम्ही शिंगावर घेऊ असा टोला भरत गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरेंना लगावला.
आमदार महेंद्र दळवी काय म्हणाले?
महायुतीचे सरकार दुसऱ्यांदा बनवण्यात महिलांचा मोठा हातभार आहे. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होतील यासाठी आम्ही आजही प्रयत्नशील, आग्रही आहोत. खासदार सुनील तटकरे यांनी नेहमी प्रमाणे राजकारण करत आदिती तटकरे यांना पालकमंत्री केलं. पण सुनील तटकरे यांनी लक्षात घ्यावं की येथील मोठी घराणेशाही आम्ही संपवली. आता दुसरी घराणेशाही देखील संपवणार आणि तटकरेंना पहिल्या बाकावरुन शेवटच्या बाकावर बसवणार, असा सल्लड दम शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंना दिला.
महायुतीतील पालकमंत्रिपदाचा वाद चव्हाट्यावर-
राज्य सरकारकडून 18 जानेवारी रोजी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Ministers List) जाहीर करण्यात आली. यात रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे आणि नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले आणि नाशिकमधून दादा भुसे हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर अवघ्या एक दिवसात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. यामुळे महायुतीतील पालकमंत्रिपदाचा वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.