Raigad : वाद भडकला अन् रायगडचं पालकमंत्रिपद पुन्हा अडकलं; तटकरे की गोगावले, पालकमंत्रिपदी कोण? की दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ?
Bharat Gogawale Vs Aditi Sunil Tatkare : राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यामागे शिंदे सेनेचा ससेमिरा कायम लागला असून त्यांना पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे.
रायगड : राज्याच्या पालकमंत्रिपदाची दोन दिवसांपूर्वी यादी जाहीर झाली आणि नव्या वादाला तोंड फुटलं. लांबणीवर गेलेले पालकमंत्रिपद कधी घोषित होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होतं. त्याचवेळी आता पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीत नव्या वादाला सुरूवात झाली. या वादाचे निमित्त आहे ते रायगड आणि नाशिकमध्ये शिंदेच्या सेनेतील दोन बड्या नेत्यांचं हुकलेले पालकमंत्रिपद.
हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केलेले जुने ज्येष्ठ शिवसैनिक भरत गोगावले आणि दादा भुसे यांना त्यांच्या जिल्ह्यात पालकमंत्रिपदापासून दूर ठेवल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर जागोजागी निदर्शने करत जाळपोळ केली आणि निषेध केला. त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारनेही नमते घेतलं आणि दोन दिवसातच या जिल्ह्यातील पालकमंत्री पदावर स्थगिती आणण्यात आली.
कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तर या कारनाम्यात सुनील तटकरे यांचाच हात असल्याचा आरोप केला. एवढंच काय तर विधानसभेच्या निवडणुकीत रायगडमधील सेनेच्या तीनही आमदारांना पाडण्याचा डाव तटकरेंनी आखला होता असाही आरोप त्यांनी केला. एकवेळेस भाजपला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री दिले तरी चालेल पण आदिती तटकरे यांना कदापी चालणार नाही अशा शब्दात थोरवे यांनी आपला याबाबतचा राग माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्याची आमची सर्वांची मागणी असताना सुद्धा असा निर्णय घेण्यात आला हे न पटण्यासारखे आहे असं ते म्हणाले.
भरत गोगावले हे मागच्या वेळेसच जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचे दावेदार होते. त्यांनी पक्षाच्या संघटनेला बळ देण्याचं काम केलं आहे आणि मंत्रिपदाचा त्याग केला असं महेंद्र थोरवे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या आघाडी सरकारमध्येसुद्धा ठाकरेंनी गोगावले यांना डावलून पहिलीच आमदारकीची टर्म असलेल्या सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात घेतलं. चुकीचा निर्णय आमच्यावर अन्याय केल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला. महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या उठावात आमचा तिघांचा मोठा वाटा आहे आणि याच अन्यायाला वाचा फोडण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी केलं असंही ते म्हणाले.
कितीही झालं तरी राष्ट्रवादीचा पालकमंत्री कदापी खपवून घेणार नाही अशा शब्दात आता महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांना खुल आव्हान दिलं. त्यामुळे रायगडचा पालकमंत्री कोण होणार? भरत गोगावले यांना संधी मिळणार का? की यावेळीसुद्धा दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ होतोय हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
ही बातमी वाचा: