Malegaon : साध्वी प्रज्ञासिंहांच्या उपस्थितीत होणाऱ्या मालेगावातील कार्यक्रमाला परवानगी नाकारली; कार्यक्रम घेणारच, आयोजकांचा पवित्रा
Pragya Singh Thakur : मालेगावात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना हिंदूवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. साध्वी प्रज्ञासिंह या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहेत.

नाशिक : भाजपच्या माजी खासदार आणि मालेगाव बाँम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुढी पाडव्याच्या दिवशी मालेगावमध्ये होणाऱ्या विराट हिंदू संत संमेलनास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.
पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने आयोजकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मालेगावात होणाऱ्या हिंदू संत संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह यांना हिंदूवीर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या साध्वींनी संमेलनाचे निमंत्रण स्विकारल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. पण आता साध्वींच्या उपस्थितीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने पीडितांच्या वकिलांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उपस्थितविषयी विशेष एनआयए न्यायालयात हरकत घेतली आहे. साध्वी मालेगाव 2008 सालच्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहेत. हा बॉम्बस्फोट रमजान महिन्यात घडविण्यात आला होता.
मालेगावमध्ये होणारे हे संमेलन रमजान पर्वात होत असल्याने साध्वींना कुठल्याही परिस्थितीत शहरात घुसू देणार नाही असा इशारा समाजवादी पक्षातर्फे देण्यात आला आहे. तर साध्वींना रोखून दाखवा असे प्रतिआव्हान हिंदुत्ववादी संघटनांनी दिले आहे.
नागपूर दंगल आणि आगामी सण, उत्सव पहाता पोलिसांनी या संमेलनास परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्याने आयोजकांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत संमेलन होणारच असा पवित्रा आयोजकांनी घेतला आहे.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भाजपच्या माजी खासदार आहेत. 2019 साली त्या मध्य प्रदेशातील भोपाळमधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 साली मात्र पक्षाने त्यांना तिकीट नाकारले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण काय?
मालेगावमधील एका मशिदीच्या आवारात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण जखमीदेखील झाले होते. या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी आणि अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) या प्रकरणाचा तपास करत होतं. मात्र, नंतर हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
