Nashik E-Vehicle : नाशिक आरटीओ करणार इ-बाईक्सवर कारवाई, आजपासून तपासणी
Nashik E-Vehicle : नाशिकमध्ये (Nashik) इलेक्ट्रिक बाईकने (E-Vehicle) पेट घेतल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर आता नाशिक आरटीओने (Nashik RTO) या संदर्भात तपासणी मोहीम सुरू केली आहे.
Nashik E-Vehicle : देशासह राज्यभरात इंधनाच्या किमतीत होणाऱ्या सततच्या वाढीमुळे ई-बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र असे असले तरी अनेक शहरांमध्ये (Electric bike) इलेक्ट्रिक बाईकने पेट घेतल्याच्या घटना उघडकीस आलाय आहेत. महत्वाचे म्हणजे २५० व्हॅटच्या बाइकला नोंदणीची गरज नसतांना काही उत्पादक वाहनांमध्ये अनधिकृत बदल करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नाशिक परिवहन विभागाने आता थेट तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
राज्य सरकारने (State Government) पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ लागू केले. या वाहनांना करातून शंभर टक्के सूट दिली. त्यामुळेच ई-बाईक्स घेण्याकडे नागरिकांनी धडाका लावला आहे. अनेकदा वाहन उत्पादक प्रमाणपत्र घेत नाहीत. यामुळे अनेकदा ई-बाईकमध्ये परस्पर छेडछाड करून विक्री केली जात आहे.
देशात ई- वाहनांची संख्या वाढून पेट्रोल व डिझेलवरील वाहनांची संख्या कमी व्हावी असा शासनाचा उद्देश आहे. तथापि ई- वाहनांना करातून सूट मिळत असल्याने अनेक नागरिकांनी ई- वाहने घेण्याचा धडाका लावला आहे. मात्र काही व्यावसायिकांनी याचा गैरफायदा घेत मूळच्या ई वाहनात काही अनावश्यक बदल केल्याने देशात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता यासंदर्भात नाशिक आरटीओने महत्वाचे पाऊल उचलले आहे. ई वाहनात बदल केलेला आढळल्यास आता संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा येथील नाशिक आरटीओने दिला आहे.
दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादकांना ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) इत्यादी अधिकृत एजन्सींकडून त्यांच्या वाहनांची चाचणी करावी लागेल. त्यांच्याकडून अहवाल आणि त्या आधारावर आरटीओ अशा वाहनांना नोंदणीतून सूट देते. तसेच काही बॅटरीवर चालणारे वाहन उत्पादक संबंधित एजन्सीकडून प्रमाणपत्रे न घेता ई-वाहने विकत आहेत. त्याचबरोबर अधिकृत दुचाकींमध्येही अवैध फेरफार केले जात आहेत. या गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे नाशिक आरटीओने इलेक्ट्रिक वाहनाच्या तपासणीस सुरवात केली आहे.
नाशिक आरटीओचे अधिकारी वासुदेव भगत म्हणाले कि, अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनाच्या आगीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सदर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये फेरबदल करून विक्री केली जात आहे. त्यामुळे नाशिक शहरातील संबंधित वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.