Nagpur Cyber Crime : आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टचे लोण आता ग्रामीण भागात ही जोरात; नागपूर पोलिसांनी दाखल केले तीन गुन्हे
Nagpur Cyber Crime : नागपुरात हिंसाचारच्या घटनेनंतर सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखवणाऱ्या पोस्ट आणि रील्सवर नागपूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

Nagpur Cyber Crime : नागपुरात हिंसाचारच्या घटनेनंतर सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखवणाऱ्या पोस्ट आणि रील्सवर नागपूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकवणाऱ्या रील्स पोस्ट (Cyber Crime) केल्या प्रकरणी तीन गुन्हे दाखल केले आहे. यात पारशिवनी येथील व्यक्तीने फेसबुकवर धर्म ग्रंथाबाबत वादग्रस्त व धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट टाकली. त्यानंतर पारशिवनी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इंस्टाग्राम अकाउंटवर औरंगजेबबाबत वादग्रस्त स्टोरी स्टेटस ठेवल्यामुळे काटोल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हे दाखल
तर काटोल मध्येच औरंगजेबबाबत धार्मिक भावना दुखवणारी रील पोस्ट केल्यामुळे एका तरुणावर शनिवारी गुन्हा नोंदवला गेला होता. परिणामी, आतापर्यंत नागपूर ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात वेगवेगळ्या सोशल मीडिया युझरच्या पोस्टच्या माध्यमातून नागपूरमध्ये हिंसा भडकवण्याचे काम केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. यासंदर्भात नागपूर पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्याची ही नोंद केली आहे. तर घटनेतील मुख्य आरोपी फहीम खान ने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसा भडकवण्याच्या पोस्ट केल्याचे उघड झालं आहे. त्यामुळे एकंदरीत या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आता पोलीस प्रशासन ही अलर्ट मोडवर असल्याचे चित्र आहे.
नागपूरच्या सर्व भागातली संचारबंदी मागे; जनजीवन पूर्ववत
नागपूरच्या संचारबंदी असलेल्या सर्व भागातून संचारबंदी काल दुपारी तीन वाजल्यापासून पूर्णपणे उठवली आहे. त्यामुळे महाल, छत्रपती शिवाजी चौक, चिटणीस पार्क चौक, भालदारपुरा, हंसापुरी या सर्व भागांमध्ये आता सामान्य लोकांचे जीवन पूर्ववत होताना दिसून येत आहे. यात लहान मुलं हसत खेळत शाळेत जात आहेत, छोटे व्यवसायिक आपला व्यवसाय सुरू करताना दिसत आहेत. ज्येष्ठ नागरिक व महिला सकाळच्या मॉर्निंग वॉकसह घरगुती साहित्य घेताना दिसून येत आहेत. ऑटो चालकांची लगबग दिसून येत आहे. मात्र कारण नसताना कुठलाही दोष नसताना हिंसेमुळे आम्ही बरंच काही गमावलं, अशी भावना प्रत्येकांनी व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे वर्षानुवर्षे या भागात राहणाऱ्यांचा स्पष्ट म्हणणं आहे की हिंसेच्या वेळेला दिसून येणारे चेहरे स्थानिक नव्हते, ते बाहेरचे होते. असेही मत त्यांनी व्यक्त केलीय.
इतर महत्वाच्या बातम्या























