Nashik News : नाशिकमध्ये 12 जुलैपर्यत जमाव बंदीचे आदेश लागू, शहर पोलीसांकडून खबरदारी
Nashik News : राज्यात घडणार्या कायदा व सुव्यवस्था विशेषत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात (Nashik city) 15 दिवस जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

Nashik News : राज्यात घडणार्या कायदा व सुव्यवस्था विशेषत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तसेच सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नाशिक शहरात 15 दिवस जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी नाशिक शहर पोलीसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशा परिस्थितीत काही समाज विघातक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरात पंधरा दिवस जमावबंदी आदेश लागू केले आहेत. महाराष्ट्रपोलीस अधिनियम 1951 कलम अन्वये हे आदेश पारित केले असून ते नाशिक शहरात सर्वत्र लागू करण्यात आले आहेत.
नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने काढलेल्या आदेशात म्हटले की नाशिक शहरात विविध आंदोलने, धरणे, सण-उत्सव व राज्यातील कायदा-सुव्यवस्था विषयक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात कुठे जातीय घटना घडल्यास त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटतात. विविध कामगार संघटनांचे गेट बंद व साखळी उपोषण चालू असते. काहीवेळा हिंदू-मुस्लीम यांच्यात शुल्लक कारणावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
तसेच सध्याचे राजकीय वातावरण, शिवसेना पक्षातील सदस्यांची बंडखोरी, अग्निपथ सैन्यभरती प्रक्रियेवरून आंदोलने आणि निदर्शने सुरू आहेत. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनीं मुस्लिम धर्मगुरू यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य, आगामी सण यांच्या पार्श्वभूमीवर शहरात 15 दिवसाची मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार 28 जून मध्यरात्री पासून ते 12 जुलैपर्यंत जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातही जमावबंदी आदेश
नाशिक जिल्ह्यातही जमावबंदी आदेश 15 जुलैपर्यंत लागू आहे. तसेच जिल्ह्यात विविध कंपन्या असून कामगारांच्या विविध मागण्यांसाठी औद्योगिक कलह निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम आदेश लागू करण्याची पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना विनंती केली. त्यानुसार पोलिस आयुक्त नाशिक शहर यांची हद्द वगळून पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून नाशिक अप्पर जिल्हाधिकारी यांनी हा आदेश काढण्यात आला होता. तो चार जुलैपर्यंत लागू करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
