(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकच्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय मुख्याध्यापकांवर, रेड अलर्टनंतर अधिकाऱ्यांच्या सुचना
Nashik News : नाशिकला (Nashik) रेड अलर्ट (Red Alert) जाहीर केल्यानंतर मनपा शिक्षण (Nashik Mahapalika) विभागाने शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय सर्वस्वी मुख्याध्यापकांवर दिला आहे.
Nashik News : नाशिकला (Nashik) रेल अलर्ट देण्यात आल्यानंतर जिल्हा शाळा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रेड अलर्ट (Red Alert) जाहीर केल्यानंतर मनपा शिक्षण (Nashik Mahapalika) विभागाने शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय सर्वस्वी मुख्याध्यापकांवर दिला आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा देण्यात आल्याने मनपा शालेय प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेला पाऊस अद्यापही कायम आहे. यामुळे शहरात अनेक भागात पाणी साचले असून काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्ते देखील खचल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच नाशिक जिल्ह्यास रेड अलर्ट जारी केल्याने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शिवाय गंगापूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीला पूर वाढला आहे. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे कोरोनानंतर शाळा सुरळीतपणे सुरु झाल्या होत्या. मुलांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण असताना आता अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी याबाबत मुख्याध्यापकांना सूचना केल्या आहेत. सध्या पावसाचे प्रमाण पाहता, परिस्थिती अशीच असल्यास, परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनी शाळेस सुटी देण्याचा निर्णय घ्यावा, सुटी दिल्यास नंतर अभ्यास व शालेय कामकाजाचे दिवस भरुन घेण्याची दक्षता घेण्यात यावी, अशा प्रकारची सूचना धनगर यांच्याकडून करण्यात आली आहे.
दरम्यान मागील तीन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यास (Nashik District) धुवांधार पावसाने झोडपून काढले आहे. सर्वत्र पावसाने (Heavy Rain) हाहाकार केला असून नदी नाल्याना पूर आला आहे तर अनेक भागात पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील शाळांतील मुख्याध्यापकांनी पावसाची स्थिती पाहून शाळांच्या सुट्टीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
गोदाकाठी सतर्कतेचा इशारा
नाशिकची जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या होळकर पुलाखालून 7 हजार क्युसेकने विसर्ग होत आहे. त्यामुळे गोदामाई दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. शिवाय दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे.