Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Satish Bhosale House Fire : खोक्या भोसलेवर 20 हून अधिक गुन्हे दाखल असून त्याला बीड पोलिसांनी प्रयागराजमधून ताब्यात घेतलं आहे.

बीड : खोक्या उर्फ सतीश भोसलेचं पाडलेलं घर अज्ञातांनी पेटवून (Satish Bhosale House Fire) दिल्याची घटना घडली. त्यासोबत काही जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याचं दिसून आलं. ही माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी आग विझवली. वनविभागाने कारवाई करत खोक्या भोसलेचं घर बुलडोझरने पाडलं होतं. त्यानंतर रात्रीच्या वेळी हे पाडलेलं घर पेटवण्यात आलं.
बीडमध्ये एक मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर खोक्या भोसले चांगलाच चर्चेत आला. त्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले. खोक्या भोसलेने अनेक वन्य प्राण्यांनाही मारून खाल्लं असल्याचं आणि त्यांच्या अवयवांची तस्करी केल्याची माहिती समोर आली. तसेच शिरूर कासार गावात त्याने वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रम करत घरही बांधल्याचं समोर आलं.
वनविभागाने घर पाडलं
एकीकडे खोक्या भोसलेला बीड पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली तर दुसरीकडे वनविभागाने त्याच्या घरावर नोटीस धाडली. 48 तासांमध्ये त्याला कोणतंही उत्तर न आल्याने वनविभागाने कारवाई करत खोक्या भोसलेचं घर बुलडोझरने पाडलं. त्यावेळी घरातील वस्तू बाहेर आणून ठेवण्यात आल्या होत्या.
जीवनावश्यक वस्तूही खाक
वनविभागाच्या कारवाईनंतर गुरुवारी रात्रीच्या वेळी अज्ञाताने खोक्या भोसलेचे पाडलेलं घर पेटवून दिलं. घराच्या बाजूला चिटकूनच आग लावण्यात आली. यामध्ये काही जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. पोलिसांनी सतर्कता दाखवत ही आग विझवली. या ठिकाणी असलेल्या काही महिलांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या महिलांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे.
Who Is Khokya Alis Satish Bhosale : कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. आधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.
वन्य प्राण्यांना मारणे, त्यांची शिकार करणे हे कायद्याने गुन्हा आहे असं कोणी करत असेल तर शिकार करणाऱ्या लोकांवरती कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे
ही बातमी वाचा:
























