(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime Rate : नाशिकमध्ये नवरात्रीत गुन्ह्यांची पन्नाशी, पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोऱ्या, मारहाण, घरफोड्या
Nashik Crime Rate : नाशिकमध्ये (Nashik) नवरात्रीत (Navratri) जवळपास पन्नासहून अधिक गुन्हे (Crime) घडले आहेत.
Nashik Crime Rate : वाढत्या गुन्हेगारीमुळे (Crime) नाशिककर (Nashik) सध्या भयभीत आहेत. प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. टोळकेच्या टोळके सर्रासपणे हातात चॉपर, कोयते घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. तर दांडिया खेळत असतांना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणास्तव उपनगर परिसरात एका तरुणाची पाच जणांनी चाकुने भोसकून हत्याही केल्याने नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या गंभीर झाला आहे.
यंदा कोरोना (Corona) निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव सर्वत्र उत्साहात पार पडला. मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये नऊ दिवस शहरात चोख पोलिस बंदोबस्त (Police security) तैनात असतांना देखिल प्राणघातक हल्ल्यांसह खूनाच्या (Murder) एका घटनेमुळे नाशिक हादरून गेल आहे. नवव्या माळेला उपनगर परिसरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळातर्फे आयोजित दांडिया रास कार्यक्रमातच दांडिया खेळतांना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून बाबू उर्फ कमल लोट या 21 वर्षीय युवकाची पाच जणांनी पोटात चाकू खुपसून हत्या केली. पोटात वार होताच रक्तबंबाळ अवस्थेतील बाबू एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. मात्र दसऱ्याला सकाळीच त्याची प्राणज्योत मालवली.
दांडिया चालू असताना फक्त धक्का लागल्याच्या कारणातून बाबू लोट या तरुणाचा टोळक्याने जीव घेतला. या घटनेवर राहुल दिवे, मंडळाचे संस्थापक/ काँग्रेसचे माजी नगरसेवक घडलेली घटना खूप वाईट आहे. शहरात गुन्हेगारी वाढत चालली असून पोलिसांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. अशा घटना होत राहिल्या तर आम्ही कार्यक्रमांचे आयोजन करावे की नाही असा प्रश्न आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवावे अशी आमची व काँग्रेस पक्षाची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान नाशिक शहरात फक्त नवरात्रोत्सवातच एक खून, मारहाण आणि दुखापतीचे 17, जबरी चोरीचे 08, घरफोडी आणि चोरीचे 19 तर विनयभंगाचे 04 गुन्हे दाखल झाले आहेत. टोळकेच्या टोळके सर्रासपणे हातात चॉपर, कोयते घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. किरकोळ कारणांवरून नागरिकांना मारहाण केली जात आहे. ही सर्व परिस्थिती बघता नाशिक पोलिस करतायत तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त, पौर्णिमा चौघुले यांनी सांगितले कि, आम्ही रात्रीची पेट्रोलिंग वाढवली आहे, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत असून सराईत गुन्हेगारांवर मोक्का आणि ईतर कारवाया देखील करत आहोत. खरं तर धार्मिक आणि शांत म्हणून नाशिक शहराची ओळख मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटना बघता हिच नाशिकची ओळख बदलणार तर नाही ना अशी भिती व्यक्त केली जातीय. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच राहीला नसल्याने नाशिककर सध्या भयभीत आहेत.