Nagpur Crime : जिममध्ये ओळख झाली, प्रेम झालं, लग्नही केलं, काही दिवसांतच नवरा आधीच विवाहित असल्याचं समजलं; जिम ट्रेनरविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
Nagpur : काही दिवसांतच रविकांत विवाहित असून, त्याला एक मुलगा असल्याची माहिती युवतीला कळली. याबाबत विचारणा केली असता रविकांतने युवतीला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
Nagpur Crime News : अलिकडे शहरात तरुणींचे विश्वास संपादन करुन त्यांच्यावर बलात्काराच्या घटनांचा आलेख झपाट्याने वाढत असून अशीच एक घटना नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडली. जीममध्ये कसरत करण्यासाठी येत असलेल्या एका युवतीला लग्नाचे आमीष दाखवून इथल्या जिम ट्रेनरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. युवतीच्या तक्रारीवरुन हुडकेश्वर पोलिसांनी (Nagpur Police) आरोपी जिम ट्रेनरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रविकांत अशोक धार्मिक (वय 34, केडीके कॉलेज रोड, नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे. रविकांत हा जिम ट्रेनर आहे. 29 वर्षीय युवती त्याच्या जिममध्ये कसरत करण्यासाठी येत होती. दरम्यान, दोघांमध्ये मैत्री झाली. युवतीच्या तक्रारीनुसार रविकांतने सुरुवातीला तिला आपण अविवाहित असल्याचे सांगितले. दोघांमध्ये गाठीभेटी होऊ लागल्या. त्यानंतर आरोपी रविकांतने लग्न करण्याचे आमीष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
लग्नही केले अन् पती-पत्नीप्रमाणे नांदले
युवतीने दबाव टाकल्यानंतर त्याने सीताबर्डीत एका मंडळात तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तो पतीप्रमाणे तिच्यासोबत राहू लागला. मात्र, काही दिवसांतच रविकांत विवाहित असून, त्याला एक मुलगा असल्याची माहिती युवतीला कळली. याबाबत विचारणा केली असता रविकांतने युवतीला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
शहरात घटनांमध्ये वाढ
गेल्या काही वर्षात कधी सोशल मीडिया तर कधी कार्यालय, सहकारी, जिम, कॅफे अशा विविध माध्यमातून ओळख होऊन नंतर तरुण-तरुणींमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होतात. एकमेकांना लग्नाचे आमिषही दाखवण्यात येतात. मात्र नंतर मुलांकडून टाळाटाळ होत असल्याने तरुणींकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येतो. अशा घटनांचा आलेख गेल्या काही वर्षात वाढला आहे. त्यामुळे पोलिसांपुढेही या प्रकरणांमध्ये काय भूमिका घ्यावी असा पेच निर्माण झाला आहे. तसेच या प्रकारच्या अनेक घटनांमध्ये मुलं विवाहित आढल्याचे माहिती पडल्यावर त्याच्या कुटुंबियांकडून तरुणींना विनंती केल्यावर तक्रारही परत घेण्यात येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले. मात्र तरुणींनीही कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी शहानिशा केल्यास अशा प्रकारे भविष्यातील फसवणूक टाळता येणे शक्य असल्याचेही या अधिकाऱ्याने नमूद केले.
ही बातमी देखील वाचा...