Shivsena Dasara Melava : आयुष्य वाकण्यात गेलं, तुम्ही ठाकरे नाही 'वाकडे' आडनाव लावा; ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
Dasara Melava 2023 : ज्या बाईने बाळासाहेबांना थेरडा म्हटलं, त्या बाईलाच उद्धव ठाकरे सन्मान देतात अशी टीका ज्योती वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली.
मुंबई: आम्हाला मिंधे म्हणता, तुम्ही अडीच वर्षे काय धंदे केले ते सांगा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर वाकण्यात आयुष्य गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ठाकरे नव्हे तर वाकडे आडनाव लावावं अशी जहरी टीका शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी केली. ज्या बाईने बाळासाहेबांना थेरडा असं संबोधलं त्याच बाईला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज सन्मान देतात अशीही टीका त्यांनी सुषमा अंधारे यांचं नाव न घेता केली.
ज्योती वाघमारे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, तिकडे जमले आहेत सत्तेसाठी इमान विकलेले कावळे आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आज 57 वर्षांची परंपरा असणाऱ्या या दसरा मेळाव्याच्या मंचावरून मी प्रश्न विचारते की मर्द कुणाला म्हणायचं? कोरोना काळात घरात बसणारा की पीपीई किट घालून रुग्णांची भेट घेणारा? अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात जाणारा मर्द नसतो, रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारा मर्द असतो. पेंग्विन आणणारा मर्द नाही तर अफजलखानाची वाघनखं आणणारा मर्द असतो.
बंडखोरांचा इतिहास लिहिला जातोय, तळवे चाटणाऱ्यांचा नाही
बाळासाहेबांच्या विचारांसाठी छाताडावर केसेस घेणारा मर्द असतो. मतांसाठी पावसात भिजणारे भरपूर असतात. पण लोकांच्या मदतीसाठी धावणारा मर्द असतो. अफजल खानाची समाधी उद्ध्वस्त करणारा मर्द असतो. एकनाथ शिंदे यांनी महिलांना सन्मान देणारी बाळासाहेब ठाकरेंची महिला आघाडी उभी केली, महिलांना सन्मान दिला. हे आम्हाला मिंधे म्हणतात, गद्दार म्हणतात. पण बंडखोरांचा इतिहास लिहिला जातोय, तळवे चाटणाऱ्यांचा नाही.
सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका
ज्योती वाघमारेंनी आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका केली. त्या म्हणाल्या की, बाळासाहेबांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी बाळासाहेबांना थेरडा म्हणणाऱ्या बाईला सन्मान दिला. तुळजाभवानीची चेष्टा करणारी बाई जर यांचा चेहरा असेल तर थू यांच्यावर. अशा बाईच्या पदराआड राजकारण करत असाल तर थू. हिंदुत्व विरोध करणाऱ्या लोकांना सन्मानाचं स्थान देताय.
ठाकरे आडनाव नाही वाकडे आडनाव लावा
ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांनी ठाकरे नाही तर वाकडे आडनाव लावावे. लोकांच्या पुढे वाकण्यात जिंदगी गेली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर ते कायम झुकले. आम्हाला मिंधे म्हणताय? अडीच वर्षे घरात बसून काय धंदे केलेत?
बाळासाहेबांची ती खुर्ची स्टेजवर
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गेल्या वर्षीप्रमाणं बाळासाहेबांची खुर्ची मंचावर ठेवली गेली. याच खुर्चीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात 2012 साली शेवटचे भाषण केले होते. ती खुर्ची आठवण म्हणून ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात ठेवण्यात आली होती. गेल्या वर्षी एमएमआरडीए मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात हीच खुर्ची ठेवण्यात आली होती. याही वर्षी बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची ठेवली गेली. त्या माध्यमातून शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याच खुर्चीत बसून बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धवला सांभाळा असे भावनिक आवाहन शिवसैनिकांकडे केले होते.