हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
राज्यात मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच वर्षाचा काळात पायाला भिंगरी लावून काम केलं, रात्रंदिवस काम केलं.

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं. महाराष्ट्रात आणि देशात कुठेही गेलो तर किसन नगरमध्ये आल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद घरातला आहे. आपल्या परिवारामध्ये वाढदिवस करतो त्याचा वेगळाच आनंद आहे. एकनाथ शिंदे यांना तुम्ही लहानपणापासून पाहिलं आहे, मी शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, विरोधी पक्ष नेता आणि या राज्याच्या मुख्यमंत्री झालो. त्यामुळे, किसन नगर आणि ठाणेकरांचं माझ्या यशात खूप मोठं योगदान आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. यावेळी, वाढदिवसानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra modi) गृहमंत्री अमित शाह आणि राज्यपाल महोदयांचा देखील मला फोन आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मोदींनी फोनवरुन आपुलकीने विचारपूस करत हे नातं केवळ निवडणुकीपुरतं नसून परमनंट आहे, असे मोदींनी म्हटल्याचेही शिंदेंनी सांगितले.
राज्यात मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच वर्षाचा काळात पायाला भिंगरी लावून काम केलं, रात्रंदिवस काम केलं. 27x7 महाराष्ट्राचं सरकार कसं हे सगळ्यांनी पाहिलं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील अनेक आठवणी ठाणेकरांना बोलून दाखवल्या. काल माझा वाढदिवस झाला, आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मला फोन केला. काय शिंदेजी कुठे आहात?मी म्हणालो इथेच आहे. काय करतायंत, आज तुमचा वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... त्यांनी मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या. अमित शहा, उपराष्ट्रपती, गव्हर्नर सगळ्यांनीच मला शुभेच्छा दिल्या. मोदींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर त्यांनी एकनाथ शिंदे यांची आठवण ठेवून मला फोन केला. तुमची साथ तर आहेच. मै भी तुम्हारे साथ हू... हे नातं निवडणुकी पुरतं नाही, हे परमनंट आहे, असे फोनवर मोदींशी बोलणं झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील किसन नगर येथे त्यांच्या बालेकिल्ल्यातून सांगितलं.
उद्धव ठाकरेंना टोला
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळालं, विधानसभेला आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो, असे म्हणत उद्धव ठाकरेंवरही एकनाथ शिंदेंना निशाणा साधला. उबाठा शिवसेनेने 97 जागा लढवल्या फक्त 20 जागा जिंकले. समोरच्यांवर मी वाईट बोलू इच्छित नाही. पण, त्यांचे शिव्याशाप देणं सुरूच आहे. आता तरी तुम्ही सुधरा, आमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना शिव्याशाप देतात. पण, ते तुमच्याकडून आमच्याकडे का आले, याचा तुम्ही विचार करणार की नाही, असा टोला एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना लगावला. विधानसभेत भाषण करताना बघा तुम्ही आरोप केले, त्याच्यावर मी तुम्हाला आरोप आणि उत्तर नाही दिलं. मी आरोपाला कामातून उत्तर दिलं, म्हणून मला जनतेने साथ दिली, असेही शिंदेंनी म्हटलं.
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सुरू
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी हा कक्ष संलग्न असणार आहे.
हेही वाचा
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त





















