Mumbai Police : कारमधील चालकासह आता प्रत्येक प्रवाशाला सीटबेल्ट लावणे बंधनकारक, 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी
मुंबई पोलिसांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून त्या अन्वये कारमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला सीटबेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
मुंबई: मुंबई पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा निर्णय घेतला असून शहरात आता वाहन चालकासह गाडीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सीटबेल्ट लावणं अनिवार्य असणार आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.
मुंबईत आता दुचाकीवरील सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीपाठोपाठ चार चाकी वाहनातील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर ज्यांच्या गाडीत सीटबेल्टची सोय नाही त्यांनी ती तातडीन करून घेण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.
सीट बेल्टसंबंधित आवश्यक ती सुधारणा करण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंतचा अवधील देण्यात आला आहे. त्यानंतर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
Wearing seat belts by drivers, co-passengers of four-wheelers compulsory in Mumbai from November 1: Police
— Press Trust of India (@PTI_News) October 14, 2022
काय आहे मुंबई पोलिसांची अधिसूचना
मोटार वाहन (सुधारित) कायदा 2019 कलम 194(ब) (1) मध्ये चारचाकी मोटार वाहनातील वाहन चालक आणि इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यास ते दंडास पात्र असलेबाबत सूचित करण्यात येत आहे. या अनुषंगाने ज्या चारचाकी वाहनांमध्ये सर्व सहप्रवाशांना सीटबेल्ट करता सुविधा नसेल त्यांना 1 नोव्हेंबर रोजीपर्यंत सीटबेल्टबाबत आवश्यकती सुधारणा करण्याकरता अवधी देण्यात येत आहे. त्यानंतर मुंबई शहरातील रस्त्यावरुन चारचाकी मोटार वाहनाने प्रवास करणाऱ्या चालक आणि इतर प्रवासी यांनी सिटबेल्ट लावणे बंधनकारक राहील अन्यथा त्यानंतर मोटार वाहन (सुधारित) कायदा 2019 कलम 194 (ब) (1) अन्वये कारवाई करण्यात येईल.
कारमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला सीटबेल्ट लावावा लागेल अशी घोषणा गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. तसं न केल्यास दंड भरावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला होता.
नियम काय आहे?
केंद्रीय मोटार वाहन नियम (1989) च्या कलम 138(3) नुसार कारमध्ये सीटबेल्ट प्रदान केला जातो. त्या कारमध्ये ड्रायव्हर आणि समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट बांधणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच 5 सीटर कारमध्ये मागे बसणाऱ्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. ज्या 7 सीटर कारमध्ये मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचे चेहरे पुढच्या बाजूस असतात, तिथेही सीट बेल्ट लावणे आवश्यक करण्यात आले आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) च्या नियम 138(3) अंतर्गत, मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. हा नियम सर्वांसाठी अनिवार्य आहे, हे बहुतांश लोकांना माहिती नाही. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न घातल्याने वाहतूक पोलिसही दंड आकारत नाहीत.