एक्स्प्लोर
क्रिस्टल टॉवर आग : इमारतीतील अग्निसुरक्षेची जबाबदारी रहिवाशांची : बिल्डर
2012 सालापासून आम्ही इमारतीमधील रहिवाशांना सोसायटी स्थापन करण्यास सांगितलं, तरीही त्यांनी ती स्थापन केली नाही, असं म्हणत बिल्डरने आपली जबाबदारी पूर्णपणे झटकली.
मुंबई : इमारतीच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी ही तिथल्या रहिवाशांची आहे, असा संतापजनक दावा क्रिस्टल टॉवर आग प्रकरणी अटकेत असलेला आरोपी विकासक सुपारीवाला याच्यावतीने कोर्टात करण्यात आला. परळ येथील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगी प्रकरणी बिल्डर अब्दुल रझ्झाक इस्माईल सुपारीवाला याला 27 ऑगस्टपर्यंत भोईवाडा कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
2012 सालापासून आम्ही इमारतीमधील रहिवाशांना सोसायटी स्थापन करण्यास सांगितलं, तरीही त्यांनी ती स्थापन केली नाही, असं म्हणत बिल्डरने आपली जबाबदारी पूर्णपणे झटकली. सोसायटी स्थापन करुन अग्निसुरक्षेची व्यवस्था लोकांनी करणं आवश्यक होतं, असं म्हणत बचाव पक्षाने दुर्घटनेचं खापर रहिवाशांवर फोडलं. तसंच 2012 पासून आम्ही ओसी आणि अग्निसुरक्षेचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, पण आम्हाला ते अजूनही मिळालं नाहीत, असं सांगत बीएमसीलाही दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला.
ओसी नसतानाही फ्लॅट विकले
या प्रकरणी अग्निशमनने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसतानाही हे फ्लॅट विकल्याचा आरोप केला आहे. तसंच या इमारतीत आग विझवण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना कार्यान्वित करण्यात आली नव्हती, असंही सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं. या इमारतीच्या आठव्या मजल्यावर एक अनधिकृत बांधकाम आहे आणि एका अनधिकृत बांधकामावर बीएमसीने हातोडा चालवला आला होता, अशीही माहितीही यावेळी कोर्टाला देण्यात आली. अशा बेकायदा बांधकामामुळे इमारत राहण्यासाठी धोकादायक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तसंच याप्रकरणी सुपारीवाला याचे इतर सहकारी यात सहभागी होते का? याबाबतता तपास करायचा असल्याने त्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी कोर्टाकडे केली आहे.
क्रिस्टल टॉवरला मोठी आग
परेल पूर्वमधील हिंदमाता परिसरातील 17 मजली क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर बुधवारी (22 ऑगस्ट) सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आणि सहा पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच इमारतीमध्ये अडकलेल्या 25 जणांना हायड्रोलिक शिडी आणि क्रेनच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढलं.
लिफ्टमध्ये गुदमरुन मृत्यू
आग लागल्यानंतर लिफ्टचा वापर करु नये, असं अग्निशमन दलातर्फे वारंवार बजावलं जातं. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करत दोघांनी लिफ्टमधून खाली येण्याचा प्रयत्न केला. आग लागल्यानंतर संजीव नायर आणि अशोक संपत हे नागरिकांना वाचवण्यासाठी गेले होते. काही लोकांना त्यांनी वाचवलंही. पण परत येताना त्यांनी लिफ्टचा वापर केला. परंतु त्यांचा लिफ्टमध्येच गुदमरुन करुण अंत झाला. तर बबलू शेख (वय 36 वर्ष) आणि शुभदा शेळके (वय 62 वर्ष) यांचाही श्वास गुदमरुन मृत्यू झाला.
मुलीच्या प्रसंगावधानाने कुटुंबीयांची सुटका
इमारतीला लागलेल्या आगीनंतर एका मुलीने प्रसंगावधान राखत आगीतून बाहेर पडण्याचं शास्त्रशुद्ध तंत्र दाखवलं आणि आपल्या कुटुंबीयांची सुटका केली. दहा वर्षांच्या झेन सदावर्तेने घरातील कपडे जमवून फाडले आणि ओले केले. ओले कपडे नाकाशी धरुन श्वासोच्छवास करण्याचा सल्ला तिने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना दिला. त्यामुळे आगीनंतर धुराचं साम्राज्य पसरलेलं असतानाही श्वास गुदमरत नाही. कपड्यात धुरातील कार्बन शोषला जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement