Pune Bypoll Election : कसब्याच्या प्रचारासाठी अमित शाह अन् शरद पवार; पोटनिवडणूकीला राजकारणी एवढं महत्व का देत आहेत?
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात अमित शाह यांच्यापासून शरद पवारांपर्यंत सगळे नेते प्रचारात उतरणार आहेत. एका विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीला एवढं महत्व का दिलं जातंय, असा प्रश्न विचारला जात आहे
Pune Bypoll election : पुण्यातील कसबा विधानसभा (Pune Bypoll Election) मतदारसंघात अमित शाह यांच्यापासून शरद पवारांपर्यंत आणि एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीसांपासून ते उद्धव ठाकरे, अजित पवारांपर्यंत नेते प्रचारात उतरणार आहेत. एका विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीला एवढं महत्व का दिलं जातंय, असा प्रश्न विचारला जात आहे .कसब्याचा निकालानंतर होणाऱ्या राजकीय परिणामांमध्ये याचं उत्तर दडलंय राज्यातील सत्तांतरानंतर थेट जनतेतून होणारी ही पाहिलीच निवडणूक असल्याने राज्यात झालेल्या राजकीय उलथापालाथेचे संदर्भही या निवडणुकीच्या निकालाला लाभणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
प्रकृती खालावली असताना ऑक्सिजन सिलेंडरसोबत खासदार गिरीश बापट कसब्याचा प्रचारात उतरलेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे देखील 22 तारखेला कसबा मतदारांघात सात ते आठ कोपरा सभा घेऊन हा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. या दोन ज्येष्ठ नेत्यांना कसब्याच्या प्रचारात उतरावं लागत असल्याबद्दल दोन्ही बाजूंकडून आरोप - प्रत्यारोप सुरु झालेत. कसब्याची जागा भाजपसाठी अडचणीत आल्याने उपचार सुरु असलेल्या गिरीश बापटांना प्रचारात उतरवलं गेलंय असा आरोप विरोधक करत आहेत. तर शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला वयाच्या 84 व्या वर्षी हा मतदारसंघ का पिंजून काढावा लागतोय असा प्रश्न भाजपकडून विचारला जात आहे.
या दोघांशिवाय दोन्ही बाजूकडील राज्यातील सर्व प्रमुख नेते कसब्यात प्रचारासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री कसब्यात सभा घेणार आहेत. भाजपचे अनेक नेते आणि मंत्री आधीपासूनच कसब्यात तळ ठोकून आहेत . तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अजित पवार , नाना पाटोले यांच्यासह सुशीलकुमार शिंदे , पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री इथे प्रचार करत आहेत. 20 तारखेला इथं आदित्य ठाकरेंचाही रोड शो होणार. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या एकत्रित सभेच्या आयोजनाचे प्रयत्नही सुरू आहे.
भाजपकडून तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कसब्यात येणार आहेत. शहांच्या पुणे दौऱ्यात कसब्यातील ओंकारेश्वराच्या दर्शनाचा कार्यक्रम मोठ्या खुबीने भाजपकडून आखण्यात आलाय. या सगळ्या राजकीय नेत्यांनी आपली सगळी ताकद पणाला लावलीय कारण या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात जो संदेश जाणार आहे त्याचं महत्व या नेत्यांना चांगलच समजलं आहे.
राज्यात सत्तानंतर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराबाबत दावे - प्रतिदावे करण्यासाठी या निवडणूक निकालाचा उपयोग होणार आहे .
निवडणूक कोणतीही असो, मुरलेले राजकारणी ती गांभीर्याने लढवतात. पण कसब्याची निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे या निवडणुकीचे निकाल राजकारण्यांसाठी महत्वाचा आहे. शिवाय राज्यातील सरकार किती काळ सत्तेवर राहणार की मध्यावधी निवडणुका लागणार याची चर्चा दरररोज सुरू आहे. या निवडणुकांसाठीचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कसब्याच्या निकालातून होणार आहे आणि याहून महत्वाचं म्हणजे आठ महिन्यांपूर्वी राज्यात झालेलं सत्तानंतर योग्य - होतं की अयोग्य याबाबत आपापली बाजू मांडण्यासाठी या निवडणुकीच्या निकालाचा उपयोग केला जाणार आहे.