Exclusive: 'मुंढे कर्मचाऱ्यांना धमकवायचे', तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी मंत्री तानाजी सावंतांचं पत्र ABP Majhaच्या हाती
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंच्या (IAS Tukaram Mundhe) बदलीसाठी राज्याचे मंत्री तानाजी सावंतांनी (Tanaji Sawant) यांनी स्वत: पत्र लिहिलं होतं.
Tanaji Sawant letter For IAS Tukaram Mundhe transfer : IAS अधिकारी तुकाराम मुंढेंच्या (IAS Tukaram Mundhe) बदलीसाठी राज्याचे मंत्री तानाजी सावंतांनी (Tanaji Sawant) यांनी स्वत: पत्र लिहिलं होतं. सावंत यांनी लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या (ABP Majha) हाती लागलं आहे. या पत्रात तुकाराम मुंढे हे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचीही तक्रार सावंतांनी केली आहे. तुकाराम मुंढे यांना कामकाजाच्या सुधारणेबाबत समज देऊनही सुधारणा होत नाही, असंही या पत्रात म्हटलं आहे. मोबाईलवरून फोन केला असता त्याला अजिबात प्रतिसाद न देणे. तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीमुळे डॉक्टर्स संघटना आक्रमक झाल्या असल्याचं देखील पत्रात म्हटलं आहे.
अधिकारी, कर्मचारी यांना धमकावणे आणि मंत्री कार्यालय संपर्क न ठेवण्याच्या सूचना मुंढेंकडून दिल्या गेल्या असल्याचंही पत्रात म्हटलं आहे. तानाजी सावंत यांनी याआधी बोलताना तुकाराम मुंढेंची बदली प्रशासकीय आहे, माझा त्या हात नाही, असं म्हटलं होतं. बदलीच्या आधी मुंढे आणि मी एका बैठकीनिमित्तानं भेटलो होतो, त्यानंतर मला त्यांची बदली झाल्याचं कळलं असं तानाजी सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं होतं. यानंतर आता हे तानाजी सावंत यांनीच लिहिलेलं पत्र माझाच्या हाती लागलं आहे. यावरुन आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
पत्रात तानाजी सावंत यांनी काय म्हटलं आहे...
आशा वर्कर्स व परिचर यांच्यासमोर स्फोटक वक्तव्य करून आंदोलकांच्या भावना दुखावणे
कार्यकारी अभियंता सोनवणे यांना अचानक कामावरून काढून टाकणे
मोबाईलवरून फोन केला असता त्याला अजिबात प्रतिसाद न देणे
तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीमुळे डॉक्टर्स संघटना आक्रमक झाल्या आहेत
उपरोक्त सर्व बाबी प्रशासकीय कामकाजात अक्षम्य ठरत असल्याची माझी धारणा आहे
मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही सुधारणा दिसून न येता शासनाची प्रतिमा मलिन करण्याची वृत्ती दिसून येते
त्यामुळे तुकाराम मुंढे यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी नम्र विनंती आहे, असं तानाजी सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे.
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, वर्ध्यात दिलं निवेदन
तुकाराम मुंढेंची बदली तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. तुकाराम मुंढे यांची 59 दिवसांतील अन्यायकारक बदलीबाब जिल्ह्यातील अनेक सामान्य नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे निवेदन पाठवण्यात आलंय.