Prakash Ambedkar: शिवसेना-वंचित युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता; पण माझी युती फक्त शिवसेनेसोबत, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नंतर पाहू, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य
Shivsena VBA Alliance: आमचं सगळं ठरलं आहे, फक्त घोषणा होणं बाकी असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केलं आहे.
मुंबई: राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमचं मनातून सगळं ठरलं आहे, आता फक्त घोषणा बाकी असल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले. तर माझी युती ही फक्त शिवसेनेसोबत असेल, महाविकास आघाडीमधील इतर दोन सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल काय ठरवायचं ते नंतर पाहू असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे नंतर पाहू...
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर बोलताना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "वंचित आणि शिवसेना युतीवर शिवसेनेकडून घोषणा होऊ शकते. यावर अजूनही दोन्हीकडून चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी या युतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेतलं पाहिजे असं मत मांडलं होतं. आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादीसोबतही जायला तयार आहोत. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलं आहे. सध्या वंचित आणि शिवसेना युती होईल. माझी युती ही शिवसेनेसोबत असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नंतर पाहून घेऊ."
कोणत्याही क्षणी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार, अंबादास दानवेंचे वक्तव्य
कोणत्याही क्षणी शिवशक्ती-भीमशक्ती युतीच्या घोषणेची शक्यता आहे असं वक्तव्य शिवसेना नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय. युतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे असून या युतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही अंबादास दानवे म्हणाले.
उद्या विधिमंडळात होणाऱ्या बाळासाहेबांच्या तैलचित्रांचं अनावरणाचं निमंत्रण आम्हांला मिळालं आहे. पण त्या कार्यक्रमाला जायचं की नाही ते आम्ही ठरवू असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्राची फसवणूक केली आहे असा आरोपदेखील त्यांनी केला. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांच्या पक्षांच्या कार्यक्रमात सहभागी होतात असं सांगत आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो असंही दानवे म्हणाले.
सुधीर मुनगंटीवर काय म्हणाले?
शिवसेना आणि वंचित युतीबाबत प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर यांनी कोणासोबत जावं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, पण त्यांनी एक लक्षात ठेवावं की बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेस विरोधी होते, पंडित नेहरू यांनी स्वतःच स्वतःला भारतरत्न दिला, पण काँग्रेसने संविधान निर्माता असलेल्या बाबासाहेबांना कधी भारतरत्न दिला नाही. एवढंच काय तर त्यांना कधी लोकसभेतही जाऊ दिलं नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर जरी काँग्रेससोबत गेले तरी बाबासाहेबांच्या अनुयायांना हे कधीच आवडणार नाही."
ही बातमी वाचा: