माणिकराव कोकाटे उपरे, शरद पवार त्यांना पक्षात घ्यायला तयार नव्हते, पण माझ्यामुळं... छगन भुजबळांचा हल्लाबोल
मी पक्षाचा संस्थापक सदस्य आहे. पक्ष स्थापन करताना मी शरद पवारांसोबत होतो. माणिकराव कोकाटे उपरे आहेत, अशी टीका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
Chhagan Bhujbal : मी पक्षाचा संस्थापक सदस्य आहे. पक्ष स्थापन करताना मी शरद पवारांसोबत होतो. माणिकराव कोकाटे उपरे आहेत. 5 वर्षापूर्वी ते राष्ट्रवादीत नव्हते. शरद पवारांना मी बोललो ते घ्यायला तयार नव्हते. परंतू, मी आग्रह केला म्हणून त्यांना घेतल्याचे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले. तुम्ही काल आलात तुम्हाला काय करायचं आहे? पक्ष आणि मी बघून घेईल असेही भुजबळ म्हणाले. माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या टीकेला भुजबळ यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे?
महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांची ही नाराजी अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुनच कृषिमंत्री डॉ. माणिकराव कोकाटे यांनी टीका केली आहे. पक्षानं छगन भुजबळ यांचा पुष्कळ लाड पुरवलाय. अजून किती लाड करायचे? असा टोला माणिकराव कोकाटे यांनी भुजबळ यांना लगावला होता. माझे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. बाकी कोणी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
माणिकराव कोकाटे यांची पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा बळी द्यावा अस माझ्या मनात येण शक्य नाही
माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या टीकेवर छगन भुजबळ यांनी प्रतिउत्तर देत टीका केली आहे. आज भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. नायगाव येथील डेव्हलपमेंटबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाल्याचे भुजबळ म्हणाले. मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा बळी द्यावा अस माझ्या मनात येण शक्य नाही असेही भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे की, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, दोषींवर कारवाई करणार आहेत. त्यामुळं त्याआधी मुंडेंचा राजीनामा का मागत आहेत? असेही भुजबळ म्हणाले. जोपर्यंत कन्फर्म होतं नाही, तोपर्यंत राजीनामा घेणं योग्य नाही असेही ते म्हणाले.
तेलगी प्रकरणात माझ्यावर आरोप झाला आणि माझा राजीनामा घेण्यात आला
तेलगी प्रकरणात माझ्यावर आरोप झाला आणि माझा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळं माझं उपमुख्यमंत्रीपद गेल्याचे भुजबळ म्हणाले. परंतू, सीबीआय चौकशीत माझ नाव सुद्धा आलं नाही असेही भुजबळ म्हणाले. इथं लोकशाही आहे, ठोकशाही नाही. जरांगे यांचं उपोषण सोडवायला चार पाच वेळा मुंडे गेले होते ते एकमेकांना ओळखतात असेही भुजबळ म्हणाले.