एका लग्नाची गोष्ट! करमाळ्याची नवरी, गुवाहाटीचा नवरदेव, अमेरिकेत लग्न, अक्षता करमाळा, गुवाहाटीमधून...
कोरोनाचे संकटावर मात करून माधुरी व सौभिक संसार आता सातासमुद्रापार अमेरिकेत सुरु झाला. या विवाहाला करमाळा येथून नगरे आणि गुवाहाटी येथील देब परिवाराने ऑनलाईन हजेरी लावत नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले.

करमाळा : कोरोनाच्या संकटाचा फटका अनेक क्षेत्रांना बसला तसा विवाहोत्सुक जोडप्यांनाही बसला. मात्र यातून मार्ग काढत अशा जोड्या एकत्र येत आहेत आणि आपल्या स्वप्नातील संसाराला सुरुवात देखील करत आहेत. अश्याच एका मजेशीर लग्नाचा किस्सा करमाळा येथील तरुणीचा आहे. माधुरी महेंद्र नगरे ही करमाळ्यातील डॉ महेंद्र आणि रोहिणी नगरे यांची कन्या अमेरिकेतील पर्डू युनिव्हर्सिटी येथे इंजिनियरिंग मध्ये पीएचडी करीत आहे. येथे तिची ओळख आसाम मधील गुवाहाटी च्या सौभिक सीतांशू देब याच्याशी झाली.
सौभिक हा देखील सिएटल शिकागो येथे इंजिनियरिंग मध्ये पीएचडी करीत आहे. यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि सौभिक याने माधुरीला लग्न करण्याची मागणी घातली. दोन्ही कुटुंबाकडून या लग्नाला होकार मिळाला. मात्र रस्त्यात कोरोना नावाचे संकट वाट अडवून उभे होते. जगात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याने लग्नात अडचण समोर येऊ लागली. मात्र या कोरोना संकटावर मात करीत दोन्ही कुटुंबाने ऑनलाईन लग्नाचा निर्णय घेतला.
अखेर ८ जूनला अमेरिकन वेळेनुसार सकाळी साडे अकरा वाजता तर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा विवाह सोहळा पार पडला. अमेरिकेत रजिस्टर पद्धतीने हा विवाह होताना याचे सूत्र संचालन माधुरीचा भाऊ डॉ चेतन व त्याची पत्नी डॉ काजल नगरे यांनी जर्मनीतून केले. तर करमाळा आणि गुवाहाटी येथून वधूवरांच्या 160 आप्तेष्टांनी ऑनलाईन सहभाग घेत या अनोख्या लग्नाचा आनंद लुटला . कोरोनाचे संकटावर मात करून माधुरी व सौभिक यांचा सुखी संसार आता सातासमुद्रापार अमेरिकेत सुरुवात होताना करमाळा येथून नगरे आणि गुवाहटी येथील देब परिवाराने या लग्नाच्या धार्मिक विधींची जोड ऑनलाईन पूर्ण करीत या नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
