Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
Maharashtra Fake Medicines Rackets : बनावट औषध पुरवठ्याचं रॅकेट हे भिवंडीपासून उत्तराखंडमधील हरिद्वारपर्यंत पोहोचलं आहे. पण हरिद्वारमध्ये मूळ कंपनीच अस्तित्वात नसल्याची माहिती आता उघडकीस आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात बोगस औषध पुरवठा करून सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येतेय. अशात बीडनंतर आता नांदेड जिल्ह्यातदेखील बनावट औषध आढळून आल्यामुळं खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या कंपनीने यापूर्वी बनावट औषध शासकीय रुग्णालयाला पुरवली होती, त्याच कंपनीला पुन्हा पुरवठा करण्याची मुभा देण्यात आल्याचं समोर आलं आहे.
राज्यात रुग्णांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरु आहे, याची धक्कादायक उदाहरणं सध्या समोर येतायत. आधी नागपूर, नंतर बीड आणि मग नांदेडच्या शासकीय रुग्णालयातही बनावट औषधांचा पुरवठा केला जात असल्याचं समोर आल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेलं Meclav 625 हे औषध बनावट असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालातून समोर आलं. या औषधाचा पुरवठा लातूरच्या जया एंटरप्रायजेसकडून करण्यात आला होता.
खरंतर जया एंटरप्राईजेसच्या औषध पुरवठ्यावर अन्न आणि औषध विभागानं बंदी घातली होती. पण या आदेशाला शासन स्तरावरच स्थगिती देण्यात आली. या जया एंटरप्राईजेसचा इतिहास काय आहे, तेही पाहूया.
- नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षी लातूरच्या जया इंटरप्राईजेसकडून औषध पुरवठा करण्यात आला.
- यातील औषध बनावट असल्याचे समोर आलं.
- याप्रकरणी नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्यात 19 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला.
- पुढे अन्न औषध विभागाने नोटीस देऊन 25 सप्टेंबर 2024 रोजी जया इंटरप्राईजेसचा विक्री परवाना रद्द केला.
- 9 ऑक्टोबरला शासनानं आदेश काढून परवाना रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.
- त्यामुळे पुन्हा जया इंटरप्राईजेसकडून औषधांचा पुरवठा सुरू झाला.
दोन कंपन्यांकडून बोगस औषध पुरवठा
जया एंटरप्राईजेसपाठोपाठ विशाल एंटरप्राईजेसचं नावही या प्रकरणात पुढं येतंय. वर्ध्यासह काही जिल्ह्यात विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीने बनावट गोळ्या पुरवल्याचं तपासात समोर आलं होतं. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीमागे कोल्हापूरची पाटील नावाची व्यक्ती आहे. तर एम जया एंटरप्राइजेसच्या पुरवठ्यामागे हेमंत मुळे या व्यक्तीचं नाव समोर आलं होतं. दरम्यान, याप्रकरणी विशाल इंटरप्राईज कंपनीचे मालक सुरेश पाटील यांनी औषध घोटाळा प्रकरणांमध्ये आपल्या कंपनीचा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलंय.
मूळ कंपनीच अस्तित्वात नसल्याची माहिती
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रुग्णालयात बनावट औषधांच्या, खासकरून बनावट टॅबलेटच्या पुरवठ्यामागे एक मोठी चेन असल्याची माहिती समोर आली आहे. हा बोगस औषधी पुरवठा सुरू होतो तो पुरवठा करणाऱ्या एजन्सी पासून. त्याचा प्रवास भिवंडीपर्यंत जातो आणि नंतर उत्तराखंडच्या हरिद्वारपर्यंत. हरिद्वारमध्ये उत्पादन करणारी कंपनीच अस्तित्वात नसते. त्यामुळे हे औषध नेमके कुठे निर्मिती केली जाते याचं मोठं गौडबंगाल आहे.
राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य, गोरगरीब उपचार घेत असतात. दोषी आढळलेल्या कंपनीलाच पुन्हा कंत्राट देऊन गरिबांच्या जीवाशी का खेळ केला जातोय असा सवाल आता उपस्थित होतोय. सामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई होईल हीच अपेक्षा.
ही बातमी वाचा: