निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
यापैकी कोणत्याही रुग्णाची तक्रार आमच्याकडे आली नसल्याचं बीडच्या स्वराती रुग्णालयाचे डॉक्टर शंकर धपाटे यांनी Abp माझाशी बोलताना सांगितलंय.
Fake Medicine Controversy:आरोग्य यंत्रणेतील औषध पुरवठा करणारी यंत्रणा रुग्णांच्या जिवावर उठल्याचे बनावट औषधी पुरवठ्यावरून स्पष्ट झाले आहे. परंतु अन्न व औषध प्रशासनाचा कारभारही रुग्णांसाठी जीवघेणाच म्हणावा लागेल. तपासणीसाठी पाठविलेल्या गोळ्यांबाबतचा अहवाल सव्वा वर्षानंतर प्राप्त झाला आणि चौघांवर गुन्हे नोंद झाले. मात्र, तोपर्यंत या बनावट गोळ्या साडेआठ हजारांपेक्षा अधिक रुग्णांच्या पोटात गेल्या आहेत. जर यात काही घातक घटक असते तर रुग्णांचा जीव गेला तरी अहवालच आला नसता आणि कारवाईही झाली नसती. त्यामुळे हे प्रकरण किती गंभीर हेच यावरून स्पष्ट होत आहे.
विशाल एंटरप्राइजेस या पुरवठादार कंपनीने ॲजीथ्रोमायसिन-500 या 25 हजार 900 गोळ्यांचा पुरवठा केला होता. परंतु, तोपर्यंत अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या औषधी विभागातील या गोळ्यांचा साठा संपूनही गेला होता. या औषधींमध्ये Azithromicin नावाचे घटकच नसल्याचे उघड झाले होते..परंतु यामध्ये जर एखादा घातक घटक असता तर त्याचे गंभीर परिणाम झाले असते. तपासासाठी पाठवलेल्या गोळ्यांचा अहवाल येण्याआधीच साडेआठ हजार रुग्णांच्या पोटात त्या बनावट गोळ्या गेल्या. दरम्यान,सुदैवाने यापैकी कोणत्याही रुग्णाची तक्रार आमच्याकडे आली नसल्याचं बीडच्या स्वराती रुग्णालयाचे डॉक्टर शंकर धपाटे यांनी Abp माझाशी बोलताना सांगितलंय.
शासकीय रुग्णालयातच बनावट औषधांचा पुरवठा
बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानेच बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. याप्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल झालाय. ही बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात असून राज्यात त्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता फिर्यादीने व्यक्त केली आहे. अशातच आता बीड पाठोपाठ वर्धा आणि भिवंडीमध्ये सुद्धा कंत्राटदाराने बनावट औषधाचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.
चौघांवर गुन्हा
शासकीय हॉस्पिटलला बनावट औषध पुरवल्याप्रकरणी अंबाजोगाईमध्ये चार जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ही औषधी केवळ अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातच नव्हे तर वर्धा आणि भिवंडीमध्ये सुद्धा पुरवण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. याप्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे.