(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाईलाजास्तव भाजपमध्ये गेलेल्या अस्वस्थ नेत्यांच्या घरवापसीबाबत तातडीने निर्णय घ्यावा : अशोक चव्हाण
नाईलाजास्तव दुसऱ्या पक्षात गेलेल्या नेत्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करायची आहे. त्यांच्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असं आवाहन मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केलं आहे.
मुंबई : नाईलाजास्तव दुसऱ्या पक्षात गेलेल्या नेत्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करायची आहे. त्यांच्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असं आवाहन मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केलं आहे. आज खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले की, डॉ. सुनिल देशमुख स्वगृही परतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मध्यंतरी अनेक काँग्रेस नेते नाईलाजास्तव भाजपात गेले. पण ते अस्वस्थ आहेत. त्यांचे मन तिकडे रमत नाही. त्यामुळे त्यांच्या घरवापसीबाबत तातडीने निर्णय घेऊन त्यांना पुन्हा जोमाने काँग्रेस उभारणीच्या कामाला लावले पाहिजे. त्या नेत्यांची इच्छा दुसरीकडे जायची नव्हती पण नाईलाजाने गेले.
डॉ. सुनिल देशमुख स्वगृही परतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मध्यंतरी अनेक काँग्रेस नेते नाईलाजास्तव भाजपात गेले. पण ते अस्वस्थ आहेत. त्यांचे मन तिकडे रमत नाही. त्यामुळे त्यांच्या घरवापसीबाबत तातडीने निर्णय घेऊन त्यांना पुन्हा जोमाने काँग्रेस उभारणीच्या कामाला लावले पाहिजे. pic.twitter.com/OftEh4i0jq
— Ashok Chavan (@AshokChavanINC) June 19, 2021
चव्हाण म्हणाले की, सुनील देशमुखांची व्यथा ऐकली. त्यांची कारकीर्द आम्ही पाहिलीय. ते लढणारे नेते आहेत. हे आम्ही कधी विसरु शकत नाही. ते कुठं जरी गेले तरी त्यांचं मन काँग्रेसमध्ये होतं. 12 वर्षांनंतर सुनील देशमुख परत आले. विदर्भात आणि महाराष्ट्रात त्यांनी जोमानं काम करावं, असं अशोक चव्हाण म्हणाले.
डॉ सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये घरवापसी
अमरावतीचे भाजपचे माजी आमदार डॉ सुनील देशमुख यांनी आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली. डॉ. सुनील देशमुख हे 2004 साली अमरावती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्री होते. त्याशिवाय, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर 2009 मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या होल्डिंग कंपनीचे माजी-उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेडचे सह-अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचे तिकीट कापून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांना काँग्रेसने उमेदवारी बहाल केली होती. देशमुख यांचे तिकीट कापल्याने नाराज झालेले शहरातील काँग्रेसचे काही पदाधिकारी देशमुख यांच्यासमवेत गेले होते. त्यावेळी प्रतिभाताई राष्ट्रपतीपदी होत्या. त्यामुळे देशविदेशातील प्रसारमाध्यमे आणि राजकीय पुढाऱ्यांचे अमरावती मतदारसंघाकडे लक्ष होते. रावसाहेब शेखावत विरुद्ध डॉ. सुनील देशमुख ही लढत आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय झाली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थतीत विजय मिळवण्याचे आव्हान त्यावेळी राष्ट्रपती पुत्रापुढे होते आणि त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रपती पुत्र रावसाहेब शेखावत जवळपास 5 हजार मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपनं त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देखील सोपवली होती. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांचा जवळपास 30 हजार मतांनी पराभव केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा संजय खोडके यांनी मात्र, भाजपच्या डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप डॉक्टरांना सुरुवातीपासूनच पचनी पडली नव्हती भाजपमध्ये डॉ. सुनील देशमुख अस्वस्थ राहत होते. पक्षात ते फारसे सक्रिय राहायचे नाही.