Guru Paurnima 2022 : शिर्डीत दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता; आजपासून द्वारकामाई दर्शन वेळेत होणार बदल
Guru Paurnima 2022 : शिर्डीतील साईमंदिरात तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता दहीहंडी फोडून करण्यात आली.
Guru Paurnima 2022 : शिर्डीतील (Shirdi) साईमंदिरात (Sai Baba Temple) तीन दिवसीय साजऱ्या केल्या जाणाऱ्या गुरुपौर्णिमेचा (Guru Paurnima) आजचा शेवटचा दिवस होता. या निमित्ताने दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता करण्यात आली. समाधी मंदिरात संस्थानच्या विश्वस्त मिना शेखर कांबळी यांनी सहपरिवार साईबाबांची पाद्यपूजा केली. त्यानंतर काल्याचे किर्तन झाले आणि दहिहंडी फोडून गुरूपोर्णिमा उत्सवाची सांगता झाली. कोरोनामुळे गेली दोन वर्ष साईभक्तांना उत्सवात सहभागी होता येत नव्हते. मात्र, यावर्षी भाविकांनी भर पावसातही मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
साईबाबा संस्थानने व्दारकामाईमधील दर्शन वेळेत बदल केला आहे. या नवीन वेळेनुसार आजपासून साईबाबांची रात्रीची शेजारती होईपर्यंत द्वारकामाई भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. त्यामुळे भाविकांना रात्री उशिरापर्यंत साईधुनी आणि द्वारकामाई मंदिरात दर्शन घेता येणार आहे. यापूर्वी द्वारकामाई मंदिर 09.30 वाजता बंद होत असल्याने भाविक मंदिराबाहेर बसून आरतीचा लाभ घेत होते. मात्र, आता भाविकांना द्वारकामाईमध्ये बसून आरतीचा लाभ घेता येणार आहे. संस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत साईबाबांची रात्रीची शेजारती होईपर्यंत व्दारकामाई साईभक्तांना दर्शनासाठी खुले ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. प्रसिद्धी प्रत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून द्वारकामाईसुद्धा पहाटे 5 वाजेपासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहणार आहे.
शिर्डीतील साईमंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात महाराष्ट्रातून भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होतात. साई मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात येते. तसेच या निमित्ताने शेकडो पालख्याही साईनगरीत पोहोचतात. एकंदरीतच तीन दिवस शिर्डीतील साईमंदिरात आनंदाचं आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळतं.
महत्वाच्या बातम्या :