Guru Purnima उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईंच्या शिर्डीत भक्तांची मांदियाळी
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीतही (Shirdi) भाविकांनी एकच गर्दी केली. दोन वर्षांच्या निर्बंधानंतर या वर्षी साई मंदिर भक्तांसाठी खुले असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
शिर्डी : गुरुपौर्णिमा (Guru Purnima) अर्थातच आपल्या गुरुंना नमन करण्याचा दिवस. प्रत्येक शिष्य या दिवसाची वाट पाहत असते. वर्षभर गुरुंनी दिलेल्या ऋणातून उतराई होण्याच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीतही (Shirdi) भाविकांनी एकच गर्दी केली. गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे उत्सव साध्या पद्धतीने पार पडला होता. यावर्षी साई बाबा मंदिर (Sai Baba Temple) भक्तांसाठी खुले असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आलेल्या भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी आज साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार आहे.
देश-विदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई बाबांना भाविक गुरुस्वरुप मानतात. भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं हिच भावना ठेवून लाखो भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. नाशिक, पुणे, मुंबई आदी ठिकाणाबरोबरच परराज्यातील अनेक पालख्या साई बाबांच्या नामाचा जयघोष करत शिर्डीत दाखल झाल्या आहेत. या व्यतिरिक्त अनेक भाविक रात्रभर पायी प्रवास करत शिर्डीत दाखल झाले आहेत.
आज सकाळी काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा यांची सवाद्य मिरवणूक गुरुस्थान मार्गे द्वारकामाईत नेण्यात आली. आजच्या दिवशी गुरुला भगवंत मानून गुरुंनी आपल्यावर केलेल्या उपकरातून उतराई होण्याचा आजचा दिवस आहे. गुरुस्थान या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची गर्दी असून माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी गुरुस्थानचं महत्त्व विषद केलं.
सकाळी काकड आरती करता यावी यासाठी साई भक्त काल रात्रीपासूनच दर्शन रांगेत उभे होते. साई बाबांनी दिलेला सर्वधर्म समभावाचा संदेश जगभरात नेण्याचा संकल्प यावेळी अनेक भक्तांनी केल्याचं सांगितलं.
दरम्यान तीन दिवसात चार ते पाच लाख भाविक साईचं दर्शन घेण्याची शक्यता असून बाबांच्या झोळीतही मोठ्या प्रमाणात दान जमा होणार आहे. आज भाविकांसाठी दर्शनासाठी साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार असून सकाळपासून दर्शन रांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.
VIDEO : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी गजबजली