(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gurupournima : साईनगरी भक्तांनी गजबजली; तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, शेकडो पालख्याही दाखल
Gurupournima : शिर्डीत तीन दिवसीय उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. या निमित्ताने आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे.
Shirdi Gurupornima Utsav 2022 : गुरुपौर्णिमा (Gurupournima) उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी (Shirdi) भक्तांनी गजबजली आहे. तीन दिवसीय उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. यासाठी साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. तसेच शेकडो पालख्याही साईनगरीत पोहोचल्या असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय. गुरूपौर्णिमेचा हा उत्सव तीन दिवस असणार असून उद्या या उत्सवाचा मुख्य दिवस असणार आहे. या निमित्ताने आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षानंतर भाविकांना उत्सवात सहभागी होता येत असल्याने भाविकांच्या गर्दीने शिर्डी फुलून गेली आहे.
देश - विदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांना भाविक गुरूस्वरूप मानतात. भारतीय संस्कृतीत गुरूला देवापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं. हीच भावना मनात ठेवून लाखो भाविक साईदर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. गेली दोन वर्ष कोरोनामुळे उत्सव साध्या पद्धतीने पार पडला होता. मात्र, यावर्षी कुठलेही निर्बंध नसल्याने साईबाबांच्या नामाचा जयघोष करत असंख्य पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. यामध्ये साईबाबांची वेषभूषा परिधान करत दाखल झालेल्या परराज्यातील साईंच्या पालखीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर, याच पालखीत महिलांनी दांडिया खेळत सर्वांची मने जिंकली.
साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण :
यावर्षी मंदिरात येऊन साईंचे दर्शन घेता येत असल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या ठिकाणी 1971 पासून येणाऱ्या वयोवृध्द साईभक्त महिलेने त्यावेळची गुरुपौर्णिमा आणि आजची गुरुपौर्णिमा यातलं अंतर सांगितलं.
शिर्डीत तीन दिवस गुरूपोर्णिमा उत्सव साजरा होतो. साई समाधी मंदिरांसह परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने उद्या साईमंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. तर, अनेक धार्मिक कार्यक्रम मंदिरात पार पडणार आहेत. दोन वर्षांनंतर भाविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार तीन दिवसीय उत्सवानिमित्त शिर्डीत लाखो भाविकांची मांदियाळी असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
Gurupournima: गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी गजबजली; साईमंदिर सजलं, भक्तांची मांदियाळी!