एक्स्प्लोर
लैंगिक शोषण करुन मारहाण, पोलिसाविरोधात पीडितेचा 3 दिवस ठिय्या

नागपूर : जोपर्यंत तक्रार नोंदवून आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदविला जात नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यासमोरुन उठणार नाही, असा निर्धार करत एका तरुणीने नागपुरात पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.गेले तीन दिवस दिवस-रात्र सुरु असलेले तिचे हे ठिय्या आंदोलन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
पीडित तरुणीचा आरोप आहे की, एका पोलिस अधिकाऱ्याने आधी लग्नाचे आमिष दाखवत, तिचे लैंगिक शोषण केले आणि आता तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणून मारहाण करत आहे.
नागपूरच्या अंबाझरी पोलिस ठाण्यासमोर एका बेंचवर गेले तीन दिवस दिवस-रात्र पीडित तरुणी बसून आहे. 15 एप्रिल रोजी बोलणी करायला घरी बोलावून एका पोलिसउपनिरीक्षकाने मारहाण केल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. बलात्काराच्या जुन्या एका प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेला धमकावले.
प्रकरण काय आहे?
मुळात पीडित तरुणीची नागपूरात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकासोबत 2015 मध्ये मैत्री झाली. तिचा आरोप आहे की, संबंधित पोलिस अधिकाऱ्याने वर्षे 2016 मध्ये लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार देत तिला भेटणे बंद केले. सप्टेंबर 2016 मध्ये पीडित तरुणीने पोलिस अधिकाऱ्याविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी स्वतःच्या अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल तर केला. मात्र, आरोपी पोलिस अधिकाऱ्याला अटक केली नाही.
इतकेच नाही तर पीडित तरुणीची तक्रार येऊन आणि गुन्हा दाखल होऊन सात महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही पोलिसांनी आपल्याच अधिकाऱ्याच्या विरोधात दाखल झालेल्या बलात्काराच्या या प्रकरणात कोणतेही तपास न करता आजवर चार्जशीटही दाखल केली नाही. खरंतर नियमाप्रमाणे तीन महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करणे आवश्यक असतं.
आधीच्या तक्रारींवर पोलिस काहीच करत नाही आणि आता जुने प्रकरण मागे घेण्यासाठी आरोप लागलेला पोलीस अधिकारी मारहाण करतो आहे, असा आरोप करत पीडित तरुणीने थेट गांधीगिरी सुरु केली आणि तीन दिवसांपासून पोलीस ठाण्यासमोरच एका बेंचवर ठाण मांडलं आहे.
दुसऱ्या बाजूला आरोप लागलेल्या पोलिस अधिकाऱ्याने सर्व आरोप फेटाळून लावत तरुणी खोटे आरोप करत असल्याचा दावा केला आहे.
तीन दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या समोर सुरु असलेली पीडित तरुणीची गांधीगिरी नागपुरात चर्चेचा विषय ठरल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष घालत पीडित तरुणीला तिचे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, सध्या तरी पीडित तरुणी पोलीस ठाण्याच्या समोरून उठायला तयार नाही.
दरम्यान, बलात्काराची तक्रार येऊन आणि गुन्हा दाखल होऊन 7 महिने लोटल्यानंतरही तपास पुढे का सरकला नाही आणि नियमाप्रमाणे 90 दिवसात चार्जशीट का दाखल झाली नाही याचं कोणतंही उत्तर सध्यातरी पोलिसांकडे नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
