SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
SIP : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. याचा फटका देखील एसआयपी गुंतवणूकदारांना बसला आहे. अशावेळी एसआयपी सुरु ठेवायची की नाही असा सवाल आहे.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात सातत्यानं घसरण सुरु आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये सुरु केलेलं आयात शुल्क लादण्याचं धोरण, त्यामुळं संभाव्य वापार युद्धाची भीती, विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्यानं होत असलेली त्यांच्या समभागांची विक्री, भारतीय कंपन्यांची तिसऱ्या तिमाहीतीला कामगिरी याचा परिणाम होऊ शेअर बाजारात घसरण होत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून दीड लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. बाजारातील घसरण आणि अस्थिरतेच्या काळात अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमधील एसआयपी बंद करावी असा विचार करु शकतात. मात्र, शेअर बाजारातील घसरणीच्या काळात म्युच्युअल फंडमधील एसआयपी सुरु ठेवावी की बंद करावी याबाबतचा निर्णय गुंतवणूकदारासमोर असतो. एसआयपी संदर्भात बाजारातील घसरणीच्या काळात कोणता निर्णय घ्यावा हे सहा मुद्यांमधून समजावून घेणं आवश्यक आहे.
आर्थिक ध्येयाच्या दिशेनं वाटचाल
शेअर बाजाराच्या घसरणीच्या काळात अनेक गुंतवणूकदारांच्या एसआयपीची आकडेवारी नफ्या ऐवजी तोट्यात असल्याचं दाखवतं. गुंतवणूकदारांनी अशा काळात तुम्ही एसआयपी थांबवल्यास तुम्ही तुमच्या वित्तीय ध्येयाच्या मार्गावरील प्रवास थांबवता. त्यामुळं तुम्ही गुंतवणूक सुरु ठेवली पाहिजे. नियमितपणे एसआयपीचे हप्ते भरले पाहिजेत. थेंबे थेंबे तळे साचे, असं देखील एसआयपी गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरतं.
जेव्हा शेअर बाजारात घसरण सुरु असते तेव्हा तुम्ही कमी किमतीमध्ये तुमचा पोर्टफोलिओ वाढवू शकता. बाजारातील घसरणीच्या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात अधिक परतावा देऊ शकते.
जेव्हा मार्केट पडतं तेव्हा म्युच्युअल फंडचे अधिक यूनिट त्याच रकमेत तुम्हाला मिळू शकतात.दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास कम्पाऊंडिंगचा लाभ मिळू शकतो. जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा एसआयपी बंद केल्यास तुम्हाला कम्पाऊंडिंगचा लाभ मिळत नाही.
गेल्या 40 वर्षांचा विचार केला असता बीएसई सेन्सेक्समधील गुंतवणूकदारांना 16 टक्के सीएजीएआरनं परतावा मिळाला आहे. काही काळात कमी परतावा तर बऱ्याच कालावधीसाठी चांगला परतावा एसआयपीतून मिळाला आहे. मार्केट करेक्शनच्या काळात एसआयपी बंद केल्यास तुम्ही अतिरिक्त परतावा मिळण्यापासून वंचित राहू शकता.
जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता त्यावेळी ती प्रोफेशनल फंड मॅनेजर्सकडून आणि मजबूत वित्तीय आकडेवारीसह मॅनेज केली जाते. बाजारत घसरत असताना तुम्ही एसआयपी बंद करुन गुंतवणुकीचे दुसरे पर्याय स्वीकारल्यास तुम्हाला प्रोफेशनल फंड मॅनेजमेंटचे फायदे मिळणार नाहीत.
बाजारातील अस्थिरतेच्या लाटेच्या स्थितीवर नियमित एसआयपीच्या माध्यमातून मात करता येऊ शकते.काही काळासाठी तुमची गुंतवणूक निगेटिव्ह दिसत असली तरी दीर्घकाळासाठी तुम्हाला चांगला परतावा एसआयपीच्या माध्यमातून मिळू शकतो.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
