Santosh Deshmukh Case: बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
Beed massajog: संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करुन हत्या झाली होती. बीडमधील स्थानिक पोलिसांनी 6 ते 11 डिसेंबर या काळात तपासात अनेक गोलमाल केले आहेत.

बीड: वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी तुरुंगातून बाहेर आले तर मस्साजोग गावातील एकही व्यक्ती बाहेर दिसणार नाही. त्यामुळे सध्या गावात भीतीचे वातावरण आहे, असल्याची वक्तव्य मस्साजोगमधील एका गावकऱ्याने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर केले. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे, मेहबुब शेख यांनी मंगळवारी मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडून सुरु असलेला तपास आणि राज्य सरकारच्या एकंदर भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. आता आमचा पोलीस आणि प्रशासनावर विश्वास उरलेला नाही, असे वक्तव्य संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केले.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून संपूर्ण हत्याप्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेतला. संतोष देशमुखांची मुलगी वैभवी हिने आपल्या वडिलांना कशाप्रकारे पाळत ठेवून मारण्यात आले, याचा तपशील सुप्रिया सुळे यांना सांगितला. संतोष देशमुखांची हत्या झाली त्या रात्री 12 वाजेपर्यंत आरोपींचा फोन सुरु होता. आम्ही पोलिसांना ही गोष्ट सांगितली. मात्र, त्यांनी काहीही केले नाही. तुम्ही अंत्यविधी करा, आम्ही आरोपींना शोधतो, असे पोलीस सांगत होते. धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेला अनेकदा फोन केले. तो प्रत्येकवेळी तुझ्या भावाला आणून सोडतो, असे सांगत होता. मात्र, मारहाणीत संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर विष्णू चाटे याने फोन बंद केला. विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा मावसभाऊ होता, असे गावकऱ्यांनी सांगितले.
वैभवी देशमुखने काय म्हटले?
आवादा कंपनीत आमच्या गावातील अशोक सोनावणे यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचा माझ्या वडिलांना फोन आला. माझे वडील गावात कोणाचंही लहानसं भांडण झालं तरी मिटवायचे. अशोक सोनावणेंचा फोन आल्यानंतर माझे वडील आवादा कंपनीत गेले. तिकडे माझ्या वडिलांना मारण्यात आले. त्यावेळी गावकऱ्यांना आपल्या सरपंचाला मारल्याचा राग आला आणि त्यांनी तिकडे आलेल्या लोकांना मारहाण केली. तेव्हापासून माझ्या वडिलांचा पाठलाग सुरु झाला. माझे पप्पा लातूरला यायचे. तेव्हा एकदा-दोनदा त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला. 6 तारखेपासून आरोपी त्यांच्या मागावर होते. 9 तारखेला गावात येत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांचे अपहरण झाल्यानंतर मस्साजोगचे गावकरी दुपारी 3 वाजून 40 पासून पोलीस स्टेशनबाहेर उभे होते. मात्र, बीड पोलिसांनी सहा वाजेपर्यंत त्यांची तक्रारच घेतली नाही. बीडमधील स्थानिक पोलिसांनी 6 डिसेंबर ते 11 डिसेंबर या काळात तपासात गोलमाल केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी पाचवा आरोपी कृष्णा आंधळे सापडू कसा शकत नाही, असा सवाल उपस्थित केला. सरकार आमचे फोन टॅपिंग करु शकते, मग एखाद्या आरोपीला शोधू शकत नाही का?, असे सुप्रिया सुळे यांनी विचारले. संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख हिने म्हटले की, वाशीमधून समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलीस आरोपींच्या मागे दिसत आहेत. तिकडेच पोलिसांनी आरोपींना पकडले असते तर ते इतक्या लांब गेले नसते, असे वैभवी देशमुख हिने म्हटले.
पोलिसांनी संतोष देशमुखांचा मृतदेह कळंबला नेऊन वेगळाच प्लॅन रचला होता, गावकऱ्यांचा आरोप
संतोष देशमुख यांच्या मृतदेहाबाबत माहिती मिळाली तेव्हा गावकरी तिकडे गेले. पोलिसांना संतोष देशमुखांना कुठे नेण्यात आले आहे तिथपासून त्यांचा मृतदेह केजमध्ये आणून टाकेपर्यंत सगळे काही माहिती होते.गावकरी संतोष देशमुखांच्या मृतदेहापाशी पोहोचले तोपर्यंत पोलिसांनी तिकडे रुग्णवाहिका आणली होती. या रुग्णवाहिकेतून संतोष देशमुखांचा मृतदेह केजकडे न नेता कळंबच्या दिशेने नेण्यात आला. तिकडे एका महिलेला तयार ठेवण्यात आले होते. या महिलेशी संतोष देशमुख यांचे संबंध होते, त्यांच्यातील वादातून संतोष देशमुखांची हत्या झाली, असे पोलिसांना दाखवायचे होते. मात्र, मस्साजोग गावातील तरुण रुग्णवाहिकेचा पाठलाग करत असल्याने हा प्लॅन फसला, असे गावकऱ्यांनी सांगितले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

