ठाकरे पितापुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करला 6 दिवसांची पोलीस कोठडी
न्यायालयाने आरोपी समित ठक्करला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटनमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समित ठक्करला गिरगावातील मेट्रोपोलिटीन कोर्टाने मंगळवारी कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने आरोपी समित ठक्करला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागपूरचा रहिवासी समित ठक्कर याने ठाकरे पितापुत्रांच्याविरोधात ट्विटर वर दोन आक्षेपार्ह पोस्ट केले होते. याप्रकरणी नागपूर तसेच मुंबईच्या व्ही.पी. मार्ग पोलीस ठाण्यात ठक्कर विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी ठक्करने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. नागपूर खंडपीठाने त्याला तिथल्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी आरोपी असल्यानं तो पळून जाऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मुंबईच्या गिरगाव येथील दंडाधिकारी न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. यावर युक्तिवाद होऊ शकत नाहीच मात्र कोर्टानं आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान तक्रारदार आणि वकील धरम मिश्रा यांनी कोर्टाला सांगितले की सदर आरोपीनं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांबाबत तसेच महिलांबाबतही सोशल मीडियावर अशीच आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या आरोपीला ट्विटरवर फॉलो करतात.
कोण आहे समित ठक्कर
- 32 वर्षांचा समित ठक्कर ट्विटरवर प्रचंड सक्रिय राहणारा नागपूरचा तरुण आहे
- नागपूरच्या व्हिएमवी कॉलेज मधून बीकॉमचे शिक्षण घेणारा समित आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे.
- त्याचे ट्विटरवर 60 हजार फॉलोवर आहेत, त्यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांचा समावेश आहे.
- समित ठक्करचे कुटुंब नागपूरच्या वाथोडा भागातील व्यवसायिक कुटुंब असून सामान्य मध्यमवर्गीय आर्थिक स्थिती असलेले हे कुटुंब आहे.
- ठक्कर कुटुंबाचे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून समीत ही याच व्यवसायात सहभागी आहे
- या शिवाय ठक्कर कुटुंब अनेक सामाजिक उपक्रमात खासकरून मुक्या जखमी जनावरांच्या सेवेसाठीच्या कामात सहभागी होत असतो.
- समित उघडरीत्या कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नसला तरी शिवसेनेने समित भाजपचा कार्यकर्ता असल्याचे आणि आयटी सेलचा पदाधिकारी असल्याचा दावा केला आहे. तर भाजप ने तो आमचा कार्यकर्ता नाही असा दावा केला आहे.
- समितचे एक काका कधी काळी शिवसेनेचे स्थानीय नेते राहिले आहे. मात्र, आता ते पक्षात नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
