(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyrus Mistry : सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी पालघर पोलिसांकडून अखेर गुन्हा दाखल
उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात दोन महिन्यानंतर महिला कार चालक डॉ अनाहिता पंडोल यांच्याविरोधात पालघरच्या कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Palghar News: टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांचा गुजरातहून मुंबईकडे कारने येत असताना पालघरमधील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनाहिता पंडोले आणि त्यांचे पती डेरियस पंडोले गंभीर जखमी झाले होते. अपघात झाला त्यावेळी मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पंडोले या कार चालवत होत्या. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी गाडी चालवणाऱ्या अनहिता पंडोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला कार चालक डॉ अनाहिता पंडोल यांच्यावर कलम 304(अ ), 279, 337, 338 प्रमाणे पालघरच्या कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात झाला तेव्हा सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले कारमध्ये मागच्या सीटवर बसले होते. तर, अनाहिता पंडोले आणि डेरियस पंडोले पुढे बसले होते. कार अनहिता पंडोले चालवत होत्या. या अपघातामध्ये मागच्या सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, पंडोले पती-पत्नी या अपघातात जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी माहिती देताना सांगितलं होतं, की मागे बसलेले मिस्त्री आणि जहांगीर पंडोले या दोघांनीही सीट बेल्ट लावलेला नव्हता. यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, मर्सिडीजने मुंबईपासून 120 किमी अंतरावर असलेल्या पालघरमधील चारोटी चेकपोस्ट पार केल्यानंतर नऊ मिनिटांत 20 किमी अंतर कापलं होतं. म्हणजेच गाडीचा वेगही जास्त होता.
हा अपघात घडल्यानंतर पण पंडोले पती-पत्नी गंभीर जखमी असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होते. सध्याही डॉक्टर अनाहिता पंडोले या रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांचे पती डेरिअस पंडोले यांना डिस्चार्ज दिल्यानंतर पालघर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन या अपघातासंदर्भात अपघाताच्या दोन महिन्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून घेतला.
त्यानंतर आज पालघरच्या कासा पोलिस ठाण्यात निष्काळजीपणाने वाहन चालवणे धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करणे आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसता नाही वाहन भरधाव वेगात चालवणे असे ठपके ठेवत डॉक्टर अनाहिता पंडोले यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पालघर पोलीस करत आहेत.
ही बातमी देखील वाचा
Cyrus Mistry:सायरस मिस्त्रींच्या अपघातग्रस्त कारचा डेटा जर्मनीला पाठवणार,अनेक प्रश्नांचा उलगडा होणार