नवरदेव बसला वरातीत डीजेसमोर नाचत, वधुपित्याने मुलीचं लग्न लावलं दुसऱ्या वरासोबत
मुहूर्तावर लागत नसल्याचं बघून वधू पित्याने नवरदेवाची वाट न बघता मंडपात असलेल्या नात्यातीलच दुसऱ्या मुलाशी आपल्या कन्येचा विवाह लावून दिला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना बुलढाण्यात घडली.

बुलढाणा : दिनांक 22 एप्रिल...मुहूर्त दुपारी 4 वाजताचा. मंडप सजला.. वऱ्हाडी जमली...वधू लग्नासाठी तयार झाली...सर्वत्र आनंदाचं वातावरण... पण नावरदेवच गावात उशिरा पोहोचला. नंतर दारुड्या वऱ्हाडी मंडळींसोबत नाचत बसला. लग्न मुहूर्तावर लागत नसल्याचं बघून वधू पित्याने नवरदेवाची वाट न बघता मंडपात असलेल्या नात्यातीलच दुसऱ्या मुलाशी आपल्या कन्येचा विवाह लावून दिला. धिंगाणा घातला म्हणून प्रस्तावित नवरदेवाला चोप देऊन माघारी पाठवलं. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना बुलढाण्यात घडली.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा गावात 22 एप्रिल रोजी एक विवाह सोहळा होता. लग्नाची सर्व तयारी झालेली होती. नवरी सजूनधजून 'येणार साजन माझा...' म्हणत नवरदेवाची वाट पाहत भावी आयुष्याचं स्वप्न रंगवत होती. सर्वत्र लग्नाची जोरदार तयारी झाली होती. नवरी आणि वऱ्हाडी मंडळी लग्नमंडपात येऊन बसली होती. दुपारचा लग्न मुहूर्त ठरलेला होता मात्र नवरदेव गावात पोहोचलाच नव्हता. नंतर वऱ्हाड्यांसह नवरदेव उशिरा पोहोचला. डीजे वाजण्यास सुरुवात झाली. वराती बेधुंद होऊन नाचू लागले आणि नवरदेवासह ते इतके बेधुंद झाले की दुपारी चार वाजताचा मुहूर्त असताना नवरदेव रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मंडपाजवळ पोहोचला. त्यावेळी वधुकडील मंडळींनी इतका उशीर का झाला म्हणून विचारणा केली आणि दोन्ही मंडळींमध्ये वाद झाला, धक्काबुक्की झाली. वधुकडील मंडळींनी वराकडील बेदम मंडळींना यथेच्छ चोप दिला आणि आल्या पावली नवरदेवाला परत पाठवलं. थोड्याच वेळात मंडपात नात्यातीलच एका मुलाशी बोलणी झाली आणि त्याच मुलाशी वधू पित्याने आपल्या मुलीचा विवाह लावून दिला.
मुहूर्त निघून गेला, नवरदेव डिजेसमोर नाचत बसला आणि उशीर झाला म्हणून हे सर्व घडलं. वधुकडील मंडळींचा रुद्रावतार बघून सर्व वऱ्हाडी आल्या पावली परत गेले. नवरदेवही ओल्या हळदीने आणि पडलेल्या चेहऱ्याने आपल्या गावी परत निघून गेला. जी घटना घडली ती अप्रिय होती पण यापुढे कोणाच्याही लेकीसोबत असा प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सामाजिक भान राखून उपाययोजना करण्याची गरज आहे.
इतर बातम्या
मुलगा नाही म्हणून काय झालं, लग्नात वधूपित्याकडून लाडक्या लेकीची घोड्यावरुन वरात!
एका लग्नाची दुसरी गोष्ट, दारुच्या नशेत दोन पुरुषांचं लग्न, दहा हजारांच्या पोटगीवर वेगळे झाले!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
