(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News : नवरदेवाला हवेत गोळीबार करणं पडलं महागात, मित्रासह नवरदेवाला पोलिसांनी केलं अटक
हवेत गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवाला अटक केली आहे. तसेच नवरदेवासह त्याच्या मित्रालाही अटक केली आहे.
Beed News : नवरदेवाला हवेत गोळीबार करणं चांगलंच महागात पडलं आहे. या संबंधित घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता नवरदेवासह त्याच्या मित्रास पोलिसांनी शेतातून अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाईतील केज रस्त्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयात बालाची भास्कर चाटे (साकूड, ता. अंबाजोगाई) या तरुणाचा हळदी समारंभाचा कार्यक्रम पार पडला होता. या लग्नात शेकडो लोकांनी हजेरी लावली होती. अगदी आनंदात आणि थाटामाटात हा हळदी समारंभ पार पडला होता. पण हळदी समारंभ पार पडल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास बालाजीने आपल्या मित्रांसोबत बेधुंद होऊन डान्स केला. यावेळी बालाजीने हातात बंदूक घेत हवेत फायरींग केली होती.
अंबाजोगाई शहराजवळील सायली लॉन्स या मंगल कार्यालयात 26 मार्चला हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवासह त्याच्या मित्राने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. बालाजी भास्कर चाटे असे अटक केलेल्या नवरदेवाचे तर बाबा शेख असे त्याच्या मित्राचे नाव आहे. हे दोघे साकुड येथील शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने दोघांना रात्री ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, उपस्थित असणाऱ्या एकाने हवेत गोळीबार केलेल्या या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई पोलिसांनी नवरदेव बालाजी चाटेसह, शेख बाबा आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल केला होता. अवैधरित्या बंदूक हातात घेऊन इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवाला अटक केली आहे. त्यामुळं हळदी समारंभात गोळीबार करणं या नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. अंबाजोगाई सारख्या शांतताप्रिय शहरात हा प्रकार घडल्यानं परिसरात खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान या घटनेचा पुढील तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: