Raj Thackeray : राज ठाकरेंची 9 एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा, विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देणार
Raj Thackeray : मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राज ठाकरे यांची ठाण्यात 9 एप्रिलला जाहीर सभा होत आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर उलटसुलट चर्चा अजूनही सुरु आहे. आणि त्याच वेळी त्यांच्या पुढच्या जाहीर सभेची घोषणा करण्यात आली आहे. राज ठाकरे हे 9 एप्रिल रोजी ठाण्यामध्ये सभा घेणार आहेत. गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्षांनी मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार आणि हनुमान चालिसा आदी विविध मुद्यांवर आपली भूमिका मांडली. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राज ठाकरे यांची ठाण्यात 9 एप्रिलला जाहीर सभा होत आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील महापालिकेच्या निवडणुका आहेत. परंतु त्याआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुढीपाडवा मेळाव्या अगोदर राज ठाकरे यांनी पुण्यात मनसेच्या सोळाव्या वर्धापनदिनी मनसैनिकांना संबोधित केले होते. राज्यात सत्ताधारी पक्षांकडून काहीच काम होत नाहीत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संपवण्याचे कारस्थान करत आहेत. यामध्ये सामान्य जनता मात्र मनसेकडून मदत मागत असल्याचं मत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत मत व्यक्त केलं आणि आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेच एक सक्षम पर्याय असू शकेल, असा विश्वास सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला, अशी टीका सर्वच स्तरातून होऊ लागली. हीच बाब लक्षात घेत 23 जानेवारीच्या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वाची कास पकडली आणि राज्यातील हिंदुत्वाची पोकळी भरण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सेनेची जागा खाली झाल्यानंतर ती जागा घेण्याचा प्रयत्न मनसेकडून पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ठाण्याच्या सभेत मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार आणि हनुमान चालिसा यावर बोलतानाच भाजपसोबत युती आणि केंद्रीय यंत्रणांच्या वाढत जाणाऱ्या कारवाया यावर भाष्य करणार का हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या :