Maharashtra Political Crisis : संघर्ष करत राहणार, नातं आणि काम यामध्ये गल्लत करणार नाही; अजित पवारांबद्दल बोलताना सुप्रिया सुळे भावुक
Ajit Pawar Maharashtra Latest News: मी पक्षाच्या बाजूने आहे आणि पक्षाचा आश्वासक चेहरा हे शरद पवार आहेत अशी पहिली प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

मुंबई: प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतोय, आपण संघर्ष करत राहणार असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule On Ajit Pawar) यांनी दिली आहे. अजित पवारांनी बंडखोरी करुन भाजप-सेना सरकारसोबत जायचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. नातं आणि काम यामध्ये आता मी गल्लत करणार नाही असंही त्या म्हणाल्या. अजित पवारांवर बोलताना सुप्रिया सुळे भावुक झाल्याचं दिसून आलं.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "पवार साहेब हेच आमच्या पक्षाचे आश्वासक चेहरा आहेत. शरद पवारांची आजची पत्रकार परिषद उर्जा देणारी आहे. शरद पवारांची पत्रकार परिषद पाहिली असेल तर संघर्ष कसा करायचा आणि त्याकडे संधी म्हणून कसं बघायचं तर ते समजतं. शरद पवार यांची प्रतिक्रिया मला ऊर्जा देणारी आहे. त्यांची साताऱ्यातील पावसातील सभा आणि आजची पत्रकार परिषद त्यांचा आत्मविश्वास दाखवते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून एक कुटुंब आहे, पवार साहेबांनी सर्वांना वडिलांचं प्रेम दिलं. आज जी काही घटना घडली ती अतिशय वेदनादायी आहे. पण आता नव्याने संघटना बांधण्याची आमची जबाबदारी आहे."
महाराष्ट्राच्या राजकारणात 1980 ची पुनरावृत्ती होणार की नाही हे काळच ठरवणार असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. मी पक्षाच्या बाजूने आहे आणि पक्षाचा आश्वासक चेहरा हा शरद पवार आहेत असंही त्या म्हणाल्या.
Supriya Sule First Reaction On Ajit Pawar : माझ्या मनात दादाबद्दल नेहमीच प्रेम राहणार
आपलं काम आणि नातं हे वेगवेगळं आहे, त्यात गल्लत करणार नाही, दादा हा माझा मोठा भाऊ आहे, माझ्या मनात दादाबद्दल नेहमीच प्रेम राहणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. दादा आणि माझा वाद कधीच होणार नाही, पण पक्षाचा प्रश्न आल्यानंतर त्यामध्ये मी गल्लत करणार नाही असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवार आणि आपल्यामध्ये जी काही चर्चा झाली ती दोघांमध्येच झाली, ती सार्वजनिक करणार नाही असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Supriya Sule Reaction BJP and PM Narendra Modi : राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या पंतप्रधानांना हे चालतं का?
खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, पंतप्रधानांनी राष्ट्रवादीला सर्वात भ्रष्टाचारी पक्ष म्हटलं होतं. आता मात्र त्यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांना सोबत घेतलं. भ्रष्टाचारी म्हणणाऱ्यांना हे कसं चालतं विचारावं लागेल.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
