Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, धरणंही भरली, अनेक नद्यांना पूर, बळीराजाही सुखावला
Nashik Rain Update : नाशिक शहरासह जिल्हा पावसाच्या (Nashik Rain Update) प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला होता गेल्या दोन महिन्यांपासून पाऊसच नसल्याने शेतकरी सुद्धा संकटात सापडला होता.
नाशिक : गेल्या एक ते दीड महिन्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे (Rain) दोन दिवसांपासून जोरदार आगमन झाले असून नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाची संततधार सुरूच असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात (Nashik dam) कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. तसेच पावसाचे पुनरागमन झाल्याने बळीराजा देखील सुखावला आहे.
नाशिक शहरासह जिल्हा पावसाच्या (nashik Rain Update) प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला होता गेल्या दोन महिन्यांपासून पाऊसच नसल्याने शेतकरी सुद्धा संकटात सापडला होता. अनेक ठिकाणी तर पिकांचे मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मेहरबान होत जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची सतत दार सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. नाशिकची (Nashik Rain) जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला देखील यंदाच्या हंगामातील पहिलाच पूर आला आहे. त्यामुळे नाशिककर देखील सुखावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर पावसाची सुरू असल्याने धरण साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे कालपासूनच विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरूच असल्याने विसर्गात वाढ करण्यात आले आहे.
दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस बरसत होता. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यातील बहुतांश धरणं कोरडीठाक होण्याच्या मार्गावर होती. मात्र दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळेच अनेक धरणातून कालपासूनच विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तसेच, काही धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून काल दुपारपासूनच विसर्ग सुरु करण्यात आल्याने गोदावरीला (Godawari) पूर आला आहे. अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने गोदावरीचे पात्र कोरडे होते, मात्र त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणसाठ्यात वाढ होत असल्याने विसर्ग सुरु झाला, त्यामुळे गोदावरी खळाळून वाहू लागली आहे.
कोणत्या धरणातून किती विसर्ग?
सध्या गंगापूर धरण (Gangapur Dam) 95 टक्के, दारणा 96 टक्के, मुकणे 84 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी शंभर टक्के, कश्यपी 77 टक्के, गौतमी गोदावरी 75 टक्के, पुणेगाव 93 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 96 टक्के, हरणबारी शंभर टक्के, केळझर 100 टक्के अशी धरण साठ्यात वाढ झाली आहे तर दारणा धरणातून आज 70 हजार 848 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. गंगापूर 4713 क्युसेक, कडवा 6482 क्युसेक, वालदेवी 2063 क्युसेक विसर्ग सुरु आहे. तर नाशिक जिल्ह्यातील एकूण धरण साठा 87 टक्के इतका आहे तर मागील वर्षी हाच धरण साठा 97 टक्के इतका होता.
इतर महत्वाच्या बातम्या :